बॉलिवुडचा दबंग, अर्थात अभिनेता सलमान खान याची हत्या करण्याचा कट होता ही माहिती उघड झाली आहे. हा धक्कादायक खुलासा गुरुग्रामच्या एसटीएफच्या टीमने केला आहे. गुरुग्रामच्या एसटीएफच्या टीमने हैदराबाद येथील गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा खास असलेल्या संपत नेहराला अटक केली आहे. संपत नेहराने मे महिन्यात सलमान खानच्या घराची रेकी कोली होती. संपत नेहरा अभिनेता सलमान खानला त्याचा चाहता असल्याचे भासवून भेटणार होता आणि त्यानंतर त्याच्या हत्येचा प्रयत्न करणार होता अशी माहितीही समोर आली आहे.
संपत नेहराने अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घराची दोन दिवस रेकी केली होती. सलमान खान किती वाजता घराबाहेर येतो, किती वाजता घरी जातो. सुरक्षा रक्षक काय करतात या सगळ्यावर संपत नेहराने पाळत ठेवली होती. काळवीट शिकार प्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर लॉरेन्सचा खास असलेल्या संपत नेहराला अटक करण्यात आली. संपतच्या कटात आणखी कोण कोण सहभागी आहे याची माहिती एसटीएफची टीम गोळा करते आहे. संपत नेहराच्या चौकशीतून आणखीही माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
लॉरेन्स बिश्नोईने तुरुंगात बसून सलमान खानच्या हत्येचा कट रचला होता. सलमान खानच्या हत्येची जबाबदारी संपत नेहरावर सोपवली होती. बिश्नोईची आणि संपत नेहराची ओळख तुरुंगातच झाली होती. तुरुंगातल्या ओळखीनंतरच संपत नेहरा बिश्नोईच्या गँगमध्ये सहभागी झाला होता. संपत नेहराला २०१६ मध्ये कार चोरी प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याने बिश्नोईसोबत हातमिळवणी केली. आता संपत नेहराच्या चौकशीत काय काय समोर येणार ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.