रेश्मा राईकवार

भयपटांच्या शैलीतला आणखी एक चित्रपट म्हणून अ‍ॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालेल्या ‘दुर्गामती’बद्दल कोण अपेक्षा होत्या.. भयपटासाठी लागणारी थरारक दृश्ये, थरारक पार्श्वसंगीताचा तडका, तेवढाच तगडा अभिनय असा सगळा मालमसाला असतानाही भीती काय ती वाटत नाही. रहस्यमय गोंधळातच हे ‘दुर्गामती’चे भयनाटय़ पार पडते. ‘भागमती’ या तमिळ-तेलुगू चित्रपटाचा रिमेक असलेल्या ‘दुर्गामती’चे दिग्दर्शनही मूळ चित्रपटाचे दिग्दर्शक जी. अशोक यांनीच केले आहे. दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आणि दिग्दर्शन शैलीचा प्रभाव असतानाही त्याच पद्धतीचा भडकपणा या चित्रपटात नाही त्यामुळे हा चित्रपट सुसह्य़ ठरतो, पण भयही वाटत नाही आणि भूतही सापडत नाही, अशी आपली अवस्था होते.

सुरुवातीच्याच फ्रेममध्ये अचानक बळी पडणारी एका गावातली माणसं दिसतात, या घटनेच्या अनुषंगाने आजूबाजूला एका पुरातन भुताने झपाटलेल्या हवेलीविषयीची कुजबूजही ऐकायला मिळते. हा सगळा भाग एकीकडे सुरू असताना वेगवेगळ्या गावांतील पुरातन मंदिरातील मूर्ती चोरीला जाण्याच्या घटना, या घटनांचा निषेध व्यक्त करत गावकऱ्यांना आपलेसे करणारा कोणी ईश्वर प्रसाद (अर्शद वारसी) नामक मंत्री, या मंत्र्याचा वाढता दबदबा लक्षात घेत त्याला वेळीच नाडण्यासाठी सुरू झालेल्या राजकीय हालचाली, त्यासाठी त्याच्यावर बसवली गेलेली सीबीआय चौकशी आणि थेट ईश्वर प्रसादला हात घालता येत नाही म्हणून कधीकाळी त्यांची सचिव म्हणून काम पाहिलेली आणि सध्या खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेली प्रशासकीय अधिकारी चंचल चौहानला (भूमी पेडणेकर) तुरुंगाबाहेर काढून तिच्यापाठी लावलेला चौकशीचा ससेमिरा.. हा सगळा घटनाक्रम एका दूर जंगलात असलेल्या हवेलीवर येऊन थांबतो. दुर्गामती नामक राणीच्या या भूतबंगल्यात चंचलची चौकशी सुरू होते आणि एक वेगळाच खेळ रंगायला लागतो. राजकीयपटाला शोभेल अशी कथावस्तू घेत सुरू झालेला हा चित्रपट पुढे पुढे सरकताना भयभूत घेऊन येतो खरा.. पण शेवटपर्यंत ते भूत नक्की आहे की नाही, हा एकच गोंधळ आपल्या मनात सुरू असतो. गमतीचा भाग म्हणजे चंचलची सीबीआय चौकशी करणारी अधिकारी सताक्षी गांगुली (माही गिल) चंचलचे सत्य शोधण्यापेक्षा दुर्गामतीचे रहस्य शोधण्यात अडकते. ना राजकीयपट ना भयपट.. अशा वेगळ्याच जोखडात अडकलेला चित्रपट एकामागोमाग एक घडणाऱ्या घटनांमुळे आपल्याला काही काळ का असेना खिळवून ठेवतो.

‘दुर्गामती’ चित्रपटाची नायिका कोण? चंचल की दुर्गामती? दुर्गामतीची कथा असेल तर ही दुर्गामती नेमकी कोण होती, तिच्याबरोबर काय घटना घडली? भुताने झपाटलेल्या या तिच्या हवेलीचं नेमकं  रहस्य काय? याची पुरेशी उत्तरं दिग्दर्शक देत नाही. एका क्षणी दुर्गामती आणि दुसऱ्या क्षणी चंचल.. हा गोंधळ पाहताना प्रियदर्शन यांच्या ‘भुलभुलैय्या’मधील मोंजूलिकाची आठवण येत राहते. मात्र इथे मोंजूलिकाच्या मदतीला आलेला मानसिक आजार चंचलच्या आजूबाजूला सुरू असलेल्या भुताटकीला साहाय्यभूत ठरत नाही. कथेतला हा गोंधळ या चित्रपटाला फार मारक ठरला आहे, सतत कथेला वळण देण्याच्या नादात दिग्दर्शकाने अनेक गोष्टी अर्धवट सोडल्या आहेत. मात्र एका भयपटासाठी आवश्यक असलेली दृश्यनिर्मिती यात प्रभावीपणे करण्यात आली आहे. दुर्गामतीचा महाल, तिचे सिंहासन, जुना भंगलेला महाल, त्यातील मोठमोठय़ा तसबिरींसह उभारलेले अनेक तपशील चोख उभारण्याचे काम चित्रपटाच्या कलादिग्दर्शकांनी केले आहे. तितकेच महत्त्वाचे काम सिनेमॅटोग्राफर कुलदीप ममानिया यांच्या कॅमेऱ्याने केले आहे. चित्रपटातील रहस्यमयी घटनांना वेगाने आपल्यासमोर आणणारा कॅमेरा त्याच्या नजरेतून अनेक गोष्टी टिपत राहतो आणि आपल्याला काळजाचा ठोका वाढवत राहतो. त्याला पार्श्वसंगीताचीही उत्तम जोड मिळाली आहे.

चित्रपटातील सगळेच कलाकार उत्तम आहेत, पण त्यांचीही रहस्यमय मांडणी करून टाकली आहे. अर्शद वारसीचा ईश्वर प्रसाद शेवटच्या काही मिनिटांपुरताच प्रभाव टाकतो. गेल्या काही महिन्यांत प्रदर्शित झालेल्या चित्रपट आणि वेबमालिकांमधून बंगाली अभिनेता जिशू सेनगुप्ताचा वावर अधिकच वाढला आहे. इथेही तो आहेच, मात्र त्याला फार काही करायची संधी दिग्दर्शकाने दिलेली नाही. माही गिलला इतक्या दिवसांनी पाहाणं हा सुखद अनुभव ठरता, मात्र या चित्रपटात तिच्याइतकी गोंधळलेली व्यक्तिरेखा दुसरी कोणतीही नाही. उरली गोष्ट अभिनेत्री भूमी पेडणेकरची. दुर्गामतीने पछाडल्यानंतर चंचलची झालेली ससेहोलपट, सत्य-असत्य किंवा भास-आभासाच्या हिंदोळ्यावरचा तिचा प्रवास भूमीने अप्रतिम रंगवला आहे. अगदी मोजक्याच दृश्यांत ती दुर्गामती म्हणून आपल्यासमोर उभी ठाकते, मात्र तिची ही प्रतिमा दिग्दर्शक ज्या प्रभावीपणे आपल्यासमोर ठेवतो त्याच वेगाने त्या प्रतिमेला तो छेदही देतो. ईश्वर प्रसादच्या आजूबाजूला खेळवत ठेवलेला संशयही एका वळणावर प्रेक्षकाला तोच तो.. याची ग्वाही देऊन जातो. मात्र तरीही रहस्याचा गोंधळ काही संपत नाही. अखेर हे रहस्य उघडकीला येतं, पण दुर्गामतीच्या महालातील भूत तिथेच भिंतीवर सावलीसारखं टांगून राहिलेलं दिसतं. आपली ‘चंचल’ता काही संपत नाही आणि दुर्गामती काही सापडत नाही.