मालिकांच्या शूटिंगला सुरुवात झाली असली तरी सेटवर करोनाचा धोका कायम आहे. ‘एक महानायक बी. आर. आंबेडकर’ या मालिकेच्या सेटवरील एका कलाकाराला करोनाची लागण झाली आहे. यानंतर ताबडतोब मालिकेचं शूटिंग थांबवण्यात आलं आहे. ‘एबीपी माझा’ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

अँड टीव्हीवर ही हिंदी मालिका प्रसारित केली जाते. दादासाहेब फाळके चित्रनगरी अर्थात फिल्मसिटी गोरेगाव इथे या मालिकेच्या शूटिंगला सुरुवात झाली. रविवारी या मालिकेतील कलाकार जगन्नाथ निवंगुणे यांना करोना झाल्याचं निदान झालं. मालिकेत बाबासाहेबांच्या वडिलांची भूमिका ते साकारतात. जगन्नाथ यांच्यावर सध्या वरळी येथील रुग्णालयात उपचार सुरू असून ते सुखरुप आहेत.

निवंगुणे यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मालिकेचं चित्रीकरण थांबवण्यात आलं. त्यांनी कोणतीच लक्षणे जाणवत नव्हती. त्यामुळे मालिकेच्या सेटवरही तणावाचं वातावरण आहे. निवंगुणे यांच्या संपर्कात आलेल्यांचीही करोना चाचणी करण्यात येत आहे.

याआधी शूटिंगदरम्यान तेलुगू टीव्ही अभिनेत्री नव्या स्वामी हिला करोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. जवळपास तीन महिने करोनाच्या प्रादुर्भावामुळे शूटिंग बंद होतं. आता काही अटीशर्तींवर हे शूटिंग सुरु केलं असलं तरी करोनाचं आव्हान कलाकारांसमोर आहे.