बॉलीवूडसह एकूणच चित्रपटसृष्टीवर अंडरवर्ल्ड, डॉन, भाईगिरी यांचा वरचष्मा राहिला आहे. रामगोपाल वर्मासारख्या दिग्दर्शकाने तर अशा चित्रपटांच्या निर्मितीची फॅक्टरीच सुरू केली होती. अगदी यश चोप्रा आणि यश जोहर यांच्यासारख्या दिग्गजांनाही अशा चित्रपटांचा मोह आवरला नाही. त्यांनी सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या ‘अँग्री यंग मॅन’ प्रतिमेचा वापर करून त्याकाळी चर्चेत असलेल्या गँगस्टर्सना वेगळ्या नावाने, कथेला वेगळा मुलामा देत अनेक चित्रपट केले. अजूनही या विषयांवरचे अनेक चित्रपट हिंदी आणि मराठीतही पहायला मिळतात. या यादीत चक्क डॉन अरुण गवळीवरच्या हिंदी चित्रपटाची भर पडली आहे.
दगडी चाळ आणि त्यात दडलेली अरूण गवळीची गुन्हेगारी दुनिया आता रुपेरी पडद्यावर उलगडणार असून या चित्रपटात अर्जुन रामपाल अरूण गवळी उर्फ ‘डॅडी’च्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता अर्जुन रामपाल आणि फरहान अख्तरची आता चांगलीच मैत्री झाली आहे. रॉक ऑन, रॉक ऑन २ नंतर आता हे दोन्ही कलाकार पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. डॅडी चित्रपटाची कथा अरुण गवळी आणि दाऊद इब्राहिमच्या अवतीभोवती फिरताना दिसेल. त्यामुळे दाऊदच्या भूमिकेसाठी फरहान अख्तरची निवड करण्यात आल्याचे कळते. दाऊद आणि डॅडी हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते.
अर्जुन रामपालने ऑक्टोबर महिन्यात चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्याची माहिती दिली होती. त्यावेळी, जुलै महिन्यात फरहानने चित्रपटासाठी खार बंगल्यात चित्रीकरण केले होते. पण, दाऊदबद्दल चित्रपटात आणखी सविस्तर माहिती देण्याचे ठरविण्यात आल्यामुळे फरहानने पुन्हा एकदा बुधवारी चित्रीकरण केले. मुंबई मिरर या वृत्तपत्राच्या छायाचित्रकाराने पॉलिस्टर शर्ट परिधान केलेल्या आणि ७०च्या लूकमधील फरहानचे छायाचित्र कॅमे-यात कैद केले. यावेळी फरहानने विग घातला होता. तसेच, त्याच्या मिशाही ठेवण्यात आल्या होत्या. यानंतर फरहानने त्याचा सहकलाकार आणि मित्र अर्जुनला मिठीही मारली.
दरम्यान, डॅडी चित्रपट कुख्यात गुंड अरुण गवळीच्या जीवनावर आधारित असून अर्जुन हा गवळीच्या भूमिकेत दिसेल. या चित्रपटातील अर्जुनच्या लूकबाबत कमालीची गुप्तता बाळगली जात होती. पण काही महिन्यांपूर्वी दक्षिण मुंबईत अर्जुन चित्रपटाचे चित्रीकरण करत असतानाचा एक फोटो व्हायरल झाला होता. यात अरुण गवळीचा हुबेहुब लूक असलेला अर्जुन पाहावयास मिळालेला. पांढरा सदरा, डोक्यावर टोपी आणि गवळींप्रमाणेच मिश्या असा अर्जुनचा लूक होता. इटलीतील रंगभूषाकाराने अर्जुनच्या रंगभूषेचे काम हाती घेतले होते.