दादासाहेब फाळकेंनी भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया रचला. आता त्यांचा वारसा पुढे नेत मराठीतील कलाकार अत्याधुनिक तंत्रज्ञानाने चित्रपट प्रदर्शित करु पाहत आहेत, ही मराठी प्रेक्षकांसाठी अभिमानास्पद बाब आहे. तंत्रज्ञानामध्ये मराठी कलाकारांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. लव्ह- लफडे हा चित्रपट आता मोबाइल अॅपवर प्रदर्शित होणार आहे. मोबाइल अॅपद्वारे जगभरात प्रदर्शित होणारा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे.

मराठी चित्रपटांचा दर्जा दिवसें दिवस अधिक उंचावत जात आहे. नवीन येणाऱ्या आणि आलेल्या चित्रपटांचा आशय हा खूप चांगला असतो. विषय नाविन्यपूर्ण असतात पण हे विषय समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचत नाहीत. त्याचे मुख्य कारण म्हणजे वेळ आणि पैसा. तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक जण हा आपल्या कामात व्यग्र असतो किंवा मोबाइलमध्ये टाइमपास करत असतो. कुटुंबाकरिता मनोरंजनासाठी वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे मोबाइल अॅपद्वारेच प्रेषकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न मराठी चित्रपट क्षेत्रात पहिल्यांदा होत आहे. मराठी चित्रपट क्षेत्रात एचसीसी नेटवर्क अॅपद्वारे चित्रपट प्रदर्शित करणारे हे पहिलेच अॅप ठरणार आहे.

प्रेम म्हटलं की प्रेमाच्या अनुषंगाने ज्या काही घडामोडी, गंमतीजमती घडतात त्याचं चित्रण म्हणजे ‘लव्ह-लफडे’. सचिन आंबात यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सलग मोशन पिक्चर्सच्या गीता कुलकर्णी आणि सॅक्रेड बुद्धा क्रिएशनचे सुमेध गायकवाड यांची संयुक्त निर्मिती आहे. रोहित फाळके आणि रुचिरा जाधव हे नवीन चेहरे तर अभिनेता सुमेध गायकवाड आणि अभिनेत्री मोनिका दबडे मुख्य भूमिकेत या चित्रपटात झळकणार आहे. त्यांच्यासोबत या चित्रपटात समीर चौघुले, नयन जाधव, अवधूत वाडकर, संजय मोरे, कल्पेश सातपुते व कुणाल शिंदे आदी कलाकार दिसणार आहेत.