प्रसिद्ध अभिनेता आणि लेखक हेमंत ढोमे त्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक वेळा समाजात घडणाऱ्या घटनांवर व्यक्त होत असतो. काही दिवसांपूर्वीच तो राहत असलेल्या परिसरातल्या लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. हे पाहून त्याने सरकारी यंत्रणेवर ताशेरे ओढणारी पोस्ट लिहीली होती. त्याची ही पोस्ट बरीच चर्चेत आली. त्यानंतर आता अभिनेता-लेखक हेमंत ढोमे याने लसीचा पहिला डोस घेतल्याचा एक फोटो शेअर केलाय.

अभिनेता-लेखक हेमंत ढोमे हा त्याच्या सोशल मीडियावर खूपच सक्रीय असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून हेमंत त्याचे विचार चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतो. नुकतंच सरकारवर टिका केलेलं त्याचं एक ट्विट नेटकऱ्यांनी बरंच व्हायरल केलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा त्याने ट्विट करत लस मिळवण्यासाठी त्याला आलेल्या अडचणी शेअर केल्या. या ट्विटमध्ये त्याने लिहिलं, “गेले दोन दिवस अथक प्रयत्न केल्यानंतर यश आणि आता मिळणार लश… लस… प्रयत्न करत रहा, नोंदणी करताना आपल्या सोबत अजुन तीन नावं जोडा… एकत्र प्रयत्न करा!”. हे ट्विट करताना त्याने आवर्जून एक टीप जोडली आहे. ‘आरोग्य सेतू वर प्रयत्न केल्यास यशाची शक्यता थोडी जास्त आहे!’, असं म्हणत त्याने पुन्हा एकदा सरकारी यंत्रणेवर ताशेरे ओढले.

त्यानंतर आज त्याने लसीकरण केंद्रावर लस घेतल्यानंतरचा एक फोटो शेअर करून लस घेतल्याचं सांगितलं. हा फोटो शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं, “बीकेसी जम्बो लसीकरण केंद्रावर लस घेतली!उत्तम सोईसुविधा! योग्य मार्गदर्शन! अद्ययावत यंत्रणा! खूप आपुलकीने विचारपुस करणारे कर्मचारी आणि डॅाक्टर्स! धन्यवाद”.

या पुढे त्याने लिहिताना ‘लशींचं प्रमाण वाढायला हवं’ असं सांगत या ट्विटमध्ये मुंबई महापालिकेला देखील त्याने टॅग केलंय. ट्विटच्या शेवटी त्याने चाहत्यांना लस घेण्यासाठी आवाहन करून ‘मंडळी जाऊन लस घ्या!! लसीकरण करणं खूप खूप गरजेचं आहे!’, असंही त्याने या ट्विटमध्ये म्हटलंय.