छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणजे ‘बिग बॉस.’ आता लवकरच सलमान खान सूत्रसंचालन करत असलेला बिग बॉसचे १४वे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण करोनाच्या पार्श्वभूमिवर या शोमध्ये काही बदल करण्यात येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार बिग बॉस १४मध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. सर्वात पाहिले शोच्या फॉर्मेटमध्ये बदल करण्यात येणार आहे. ज्याचा लॉकडाउनशी संबंध असू शकतो. निर्माते या शोसाठी सध्या देशभरात लागू झालेल्या लॉकडाउनवर आधारित फॉर्मेट बनवू इच्छित असल्याचे म्हटले जात आहे. तसेच स्पर्धकांना बिग बॉसच्या घरात फोन वापरण्याची संधी मिळणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्याचबरोबर शोमध्ये सोशल डिस्टंसिंगचे पालन केले जाणार असल्याचे म्हटले जात आहे.

बिग बॉसच्या स्पर्धकांना बिग बॉसच्या घरात मोबाइन फोन नेण्यास परवानगी देण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. जेणेकरुन त्यांना बाहेर असलेल्या लोकांच्या संपर्कात राहता येईल. तसेच स्पर्धकांना इलेक्ट्रोनिक गॅजेट देखील देण्यात येणार आहे. त्याद्वारे त्यांना व्हिडीओ मेसेज आपल्या कुटुंबातील सदस्यांना पाठवता येणार असल्याचे म्हटले जात आहे.

ऑक्टोबर महिन्यात बिग बॉस १४चे पर्व सुरु होणार असल्याच्या चर्चा आहेत. तसेच शोमध्ये सहभागी होणाऱ्या १६ स्पर्धकांची घरामध्ये एण्ट्री करण्यापूर्वी करोना चाचणी करण्यात येणार आहे अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.