करोना व्हायरसचा वाढता फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. आता हळूहळू सर्व अनलॉक करताना दिसत आहेत. तसेच राज्य सरकारने चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणास परवानगी दिली आहे. पण त्यासाठी काही नियम आखण्यात आले आहेत. हे सर्व नियम लक्षात घेऊन आता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘द कपिल शर्मा शो’चे चित्रीकरण सुरु होणार असल्याचे म्हटले जात आहे.
‘डीएनए’ने दिलेल्या वृत्तानुसार कपिल शर्मा शोमध्ये बॉलिवूड अभिनेता सोनू सूदला गेस्ट म्हणून बोलावण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. काही दिवसांपूर्वी लॉकडाउनमुळे वेगवेगळ्या राज्यात अडकलेल्या कामगारांना सोनू सूदने आपापल्या राज्यात पोहोचवण्यासाठी मदत केली होती. त्यानंतर सोशल मीडियावर सोनू सूद चर्चेत होता. त्यामुळे कपिल शर्माच्या येत्या भागात सोनू सूदला गेस्ट म्हणून बोलवण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.
‘कपिल शर्मा शो’ २४ जून पासून सुरु होणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच शोमध्ये कलाकार त्यांच्या चित्रपटांचे प्रमोशन करण्यासाठी येत असतात. पण आता शोमध्ये काही बदल करण्यात येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार मुंबईमध्ये या महिन्यात चित्रीकरणास सुरुवात होणार आहे. पण यामध्ये वयाने १० वर्षांपेक्षा लहान मुले आणि ६५ वर्षांच्या पुढील व्यक्तींना चित्रीकरण करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. हा नियम करोना व्हायरसमुळे उद्भवलेली परिस्थिती सामान्य होईपर्यंत लागू असणार आहे. त्यामुळे आता निर्मात्यांसमोर मोठे आव्हान आहे.