बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर कायमच त्यांच्या बेधडक व्यक्तव्यांमुळे चर्चेत येत असतात. अलिकडेच त्यांनी अजानविषयी एक ट्विट केलं होतं. मोठ्या आवाजात लाऊड स्पीकरवर अजान लावल्यामुळे अनेकांना त्यांचा त्रास होतो, असं मत त्यांनी मांडलं आहे. त्यांचं हे ट्विट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे. काहींच्या मते जावेद अख्तर यांचं मत योग्य आहे. तर काहींना मात्र हे मत पटलेलं दिसत नाहीये.

जावेद अख्तर यांनी अलिकडेच एक ट्विट केलं होतं. “भारतात ५० वर्षांपर्यंत लाऊड स्पीकरवर अजान लावणं हराम होतं. मात्र कालांतराने ते हलाल झालं. इतकंच नाही तर अशा प्रकारे हलाल झालं की त्याची कोणतीही सीमा राहिली नाही. अजान करणं चांगली गोष्ट आहे. मात्र लाऊड स्पीकरवर अजान लावल्यामुळे त्याचा इतर नागरिकांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे मला आशा आहे की या परिस्थितीत नक्कीच बदल घडेल”, असं ट्विट जावेद अख्तर यांनी केलं.

जावेद यांचं ट्विट पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. आम्ही तुमच्या मताशी सहमत आहोत असं काही जण म्हणाले आहेत. तर काही जणांनी नाराजी व्यक्त करत टीकास्त्र डागलं आहे.  ‘जर एखाद्या गोष्टीवर बंदी आणायचीच आहे तर लाऊड स्पीकरवर संपूर्णपणे बंदी आणा. मग ती गणेश चतुर्थी असो किंवा अजान. कोणत्याही धर्माचं कोणतंही कार्य असलं तरीदेखील मग लाऊड स्पीकर बंदच ठेवला पाहिजे’, असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सध्या रमजानचा महिना सुरु असून या पवित्र महिन्यात जावेद अख्तर यांनी अजानविषयी केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जावेद अख्तर अनेकदा समाजात घडणाऱ्या घटनांवर उघडपणे व्यक्त होत असतात. त्यामुळे बऱ्याचदा त्यांना ट्रोलही व्हावं लागतं.