बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे कळताच अनेक कलाकारांनी ट्विट करत बिग बींसाठी प्रार्थना केली. दरम्यान अभिनेत्री जूही चावलाने केलेल्या ट्विटने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. तिने ट्विटमध्ये ऐश्वर्या आणि अभिषेकच्या मुलीचे नाव आराध्याच्या ऐवजी आयुर्वेद म्हटले होते. त्यानंतर तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. आता जूहीने ‘आयुर्वेद’ हा शब्द वापरण्या मागचे स्पष्टीकरण दिले आहे.

नुकताच जूहीने एक ट्विट केले आहे. अमित जी, अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या… तुम्ही लवकरात लवकर ठिक होण्यासाठी मी प्रार्थना करत आहे. माझ्या आधीच्या ट्विटमध्ये कोणतीही चुक नव्हती. मी ते तसेच म्हटले होते. जेव्हा मी आयुर्वेद म्हटले तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की निसर्गाच्या कृपेने सगळं काही लवकर ठिक होऊ दे या आशयाचे ट्विट तिने केले आहे.

काय होतं जूहीचं ट्विट?
या पूर्वी केलेल्या ट्विटमध्ये जूहीने ‘आमित जी, अभिषेक आणि आयुर्वेद लवकरच बरे होतील’ असे म्हटले होते. तिने ऐश्वर्या आणि अभिषेकची मुलगी आराध्याचे नाव चुकून आयुर्वेद लिहिले होते. त्यानंतर नेटकऱ्यांनी जूहीला ट्रोल करण्यास सुरुवात केली. एका यूजरने ‘आयुर्वेद आहे तरी कोण’ असे म्हटले आहे. दुसऱ्या एका युजरने ‘केश किंगची जाहिरात केल्यामुळे तिच्या मनात आयुर्वेदने घर केले आहे आणि त्याचा हा परिणाम आहे’ असे म्हटले आहे. तर आणखी एका यूजरने ‘त्यांच सोडं, तुझी लक्षणे देखील ठिक दिसत नाहीत. तू पण काळजी घे’ असे म्हटले आहे.

बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यामध्ये करोनाची सौम्य लक्षणे आढळली आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच अभिषेकने ट्विट करत पत्नी ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्याची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे सांगितले. ऐश्वर्या आणि आराध्या यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही. “त्या घरीच होम क्वारंटाइनमध्ये राहणार आहेत. मुंबई महापालिकेने सध्याच्या स्थितीबद्दल माहिती दिली असून ते आवश्यक ती सर्व पावले उचलत आहेत” असे अभिषेक बच्चनने त्याच्या टि्वटमध्ये म्हटले आहे. माझी आई जया बच्चन आणि कुटुंबातील अन्य सदस्यांचा करोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याचेही अभिषेकने सांगितले.