अभिनेता कमाल. आर. खान आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहचीच चर्चेत असतो. तो नेहमीच विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींवर टीका करतो. यावेळी त्याने अक्षय कुमार, सलमान खान, करण जोहर यांसारख्या काही नामांकित बॉलिवूड कलाकारांवर निशाणा साधला आहे. या सर्व कलाकारांनी मिळून मला संपवण्याची योजना आखली आहे, असा खळबळजनक आरोप त्याने केला आहे.

“जर मला काही झालं तर यासाठी अक्षय कुमार, आदित्य चोप्रा, सलमान खान, करण जोहर आणि साजिद नाडियाडवाला जबाबदार असतील. या सर्वांनी मिळून मला संपवण्याची योजना आखली आहे.” अशा आशयाचं ट्विट केआरकेने केलं. मात्र या ट्विटमुळे सध्या त्याला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केलं जात आहे. “इथे तर वेगळ्याच प्रकारची कॉमेडी सुरु आहे, २ मिनिटांच्या प्रसिद्धीसाठी तू काहीही करु शकतोस.” अशा आशयाच्या प्रतिक्रियांमार्फत केआरकेची खिल्ली उडवली जात आहे.

यापूर्वी केआरकेने अक्षय कुमारवर देखील टीका केली होती. अक्षयच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी त्याने केली होती. “देवी लक्ष्मी धन आणि सौभाग्यचं प्रतिक आहे. अक्षय कुमारने देवी लक्ष्मीचा अपमान केला आहे. त्यामुळे त्याला धडा शिकवण्यासाठी प्रेक्षकांनी ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटावर बहिष्कार टाकावा. म्हणावं हा कॅनडा नाही भारत देश आहे. इथे देवी-देवतांची पुजा केली जाते. त्यांची चेष्ठा करत नाही.” अशा आशयाचं ट्विट त्याने केलं होतं.