छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध खलनायिका म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे काम्या पंजाबी. ‘बिग बॉस’, ‘क्यु होता है प्यार’, ‘बनू मैं तेरी दुल्हन’, ‘कहता हैं दिल’ अशा विविध मालिकांमुळे लोकप्रिय झालेली काम्या लवकरच दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधणार आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना काम्याने स्वत: ही माहिती दिली. ४० वर्षीय काम्या पुढील वर्षी २०२०मध्ये प्रियकर शलभ डांगसोबत लग्न करणार आहे. शलभ दिल्ली स्थित असून त्याला एक १० वर्षांचा मुलगा आहे.
“आरोग्यविषयक काही समस्या असल्यामुळे माझ्या एका मित्राने मला शलभ याच्याशी संपर्क करण्यास सांगितलं होतं. त्याच्या सांगण्यानुसार मी शलभला कॉल केला. त्यानंतर जवळपास दिड महिना आम्ही कॉन्टॅक्टमध्ये होतो. यादरम्यान शलभने मला लग्नाची मागणी घातली. या काळात पुन्हा लग्न करणं हा माझ्यासाठी खूप मोठा निर्णय होता. त्यामुळे मी काही काळ वेळ मागून घेतला”, असं काम्या म्हणाली.
पुढे ती म्हणते, “पहिलं लग्न अयशस्वी ठरल्यानंतर मी लग्न, प्रेम या साऱ्याचा विचार करणं सोडून दिलं होतं. एक वेळ अशी होती जेव्हा मी पुन्हा लग्न करण्याच्या विरोधात होते. मात्र शलभमुळे माझा गेलेला आत्मविश्वास मला पुन्हा मिळाला आणि मी पुन्हा प्रेमात पडले. एक किशोरवयीन मुलगी जसं आपल्या प्रियकरावर प्रेम करते, तसंच प्रेम मी शलभवर करते”.
दरम्यान, काम्याने २००३ मध्ये व्यावसायिक बंटी नेगी याच्यासोबत लग्न केलं होतं. मात्र त्याचं नातं फार काळ टिकलं नाही. २०१३ मध्ये या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता काम्या २०२० मध्ये शलभसोबत लग्न करणार आहे. शलभला १० वर्षांचा मुलगा आहे. तर काम्याला ९ वर्षांची मुलगी आहे.