करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे चित्रपट उद्योगाला जबरदस्त फटका बसला आहे. अनेक चित्रपटांचं प्रदर्शन लांबणीवर गेलं. निर्मात्यांना कोट्यवधींचं नुकसान झालं. अनेक कलाकार बेरोजगार झाले. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीतही अभिनेता करण आनंद याने एका चित्रपटाची निर्मिती केली आहे. लक्षवेधी बाब म्हणजे लॉकडाऊनमध्येच त्याने आपल्या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं.

करणच्या या आगामी चित्रपटाचं नाव ‘इट्स ओव्हर’ असं आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्याने या चित्रपटाबाबत माहिती दिली. तो म्हणाला, “लॉकडाउनमुळे सिनेसृष्टीचं प्रचंड नुकसान झालं. दिग्दर्शकांचे अनेक प्रोजेक्ट रद्द झाले आहेत. जे चित्रपट पूर्ण आहेत त्यांना प्रदर्शनासाठी सिनेमागृह उपलब्ध नाहीत. सगळीकडे गोंधळ माजला आहे. करोनाची भीती आहे. सरकारने अनेक नियम लादले आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत दिग्दर्शकांना आपले चित्रपट पूर्ण करायचे आहेत. अशाच परिस्थितीत अडकलेल्या दिग्दर्शकावर आधारित एका चित्रपटाची निर्मिती आम्ही केली आहे. या चित्रपटाचं नाव इट्स ओव्हर असं ठेवलं आहे. सध्या चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनवर काम सुरु आहे.”

आणखी वाचा : करोनाची लस बनवण्याची विनंती करणाऱ्या चाहत्याला सोनू सूदचं भन्नाट उत्तर

इतर कलाकार लॉकडाउनमुळे आपल्या घरात शांत बसलेले असताना करण आनंदने चक्क चित्रपट तयार केला. त्याने स्वत:च या चित्रपटाचं लेखण आणि दिग्दर्शन केलं आहे. मोबाईल, लॅपटॉप आणि डिजिटल कॅमेराच्या मदतीने घरातच कुटुंबियांसोबत त्याने चित्रपटाचं चित्रीकरण केलं. मात्र हा चित्रपट कुठल्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार याबाबत त्याने अद्याप माहिती दिलेली नाही. येत्या काळात तो या चित्रपटाची अधिकृत घोषणा करणार आहे.