08 December 2019

News Flash

‘कौन बनेगा करोडपती’ला अजय-अतुलने दिला स्पेशल टच

या थिम सॉंगमध्ये एकशे दहाहून अधिक संगितकारांचा सहभाग आहे

टीव्हीवरील सुपरहिट आणि लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोच्या सूत्रसंचालनाची धूरा बॉलीवूडचे शहेनशाहा अर्थात अमिताभ बच्चन यांच्या खांद्यावर असते. किंबहुना, त्यांनी हा शो इतका उंचीवर नेऊन ठेवला आहे की त्यांच्याशिवाय हॉट सीटवर दुसरे कोणी बसले आहे, अशी कल्पना सध्या तरी त्यांच्या चाहत्यांना करणे अशक्य आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ पर्व ११च्या थिम सॉंगमध्ये काही बदल करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. हे थिम सॉंग मराठ मोळी जोडी अजय-अतुल यांनी रिक्रीएट केले आहे.

अजय आणि अतुल यांचा ‘कौन बनेगा करोडपती’चे थिम सॉंग रिक्रिएट करतानचा व्हिडीओ समोर आला आहे. ‘ हा आमच्या जीवनातील सर्वात मोठा क्षण आहे. आम्हाला मूळ गाण्यात बदल न करता हे गाणे प्रेक्षकांच्या समोर आणायचे होते. या गाण्यासाठी आम्ही सर्वांत जास्त वाद्य वापरली आहेत. आमच्या आयुष्यातले हे पहिले गाणे आहे ज्यामध्ये आम्ही सर्व वाद्यांचा वापर केला आहे. या थिम सॉंगमध्ये एकशे दहाहून अधिक संगितकारांचा सहभाग आहे. आमच्यासाठी हे थिम सॉंग रिक्रिएट करणे आव्हानात्मक होते’ असे अजय आणि अतुल यांनी व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

दरम्यान सोनी टीव्हीने ‘कौन बनेगा करोडपती’चा एक टीझर देखील प्रदर्शित केला आहे. त्यांनी हा टीझर त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या टीझरमध्ये अमिताभ यांची धमाकेदार एण्ट्री पाहयला मिळत आहे. तसेच त्यांनी प्रेक्षकांना १९ ऑगस्ट पर्यंत वाट पाहण्यास सांगितले आहे कारण शोचा प्रिमिअर १९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

First Published on August 13, 2019 7:47 pm

Web Title: kbc theme song recreate by ajay atul avb 95
Just Now!
X