कौन बनेगा करोडपती या रिअॅलिटी शोच्या यंदाच्या सिझनमध्ये दिल्लीच्या नाजिया नसीम या पहिल्या करोडपती ठरल्यात. मात्र सात कोटींच्या प्रश्नाचे उत्तर नाजिया यांना देता आलं नाही. नाजिया यांना सात कोटींसाठी विचारण्यात आलेला प्रश्न हा नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याबद्दल होता. सुभाष चंद्र बोस यांनी सिंगापुरमध्ये कोणत्या ठिकाणी आझाद हिंद सेनेची घोषणा केली होती असा हा प्रश्न होता.
त्या कार्यक्रमाला एवढी गर्दी होती की…
मात्र या प्रश्नाला नाजिया यांना उत्तर देता आलं नाही. मात्र भारत आणि भारतीयांच्या स्वातंत्र्य लढ्यामधील या ऐतिहासिक घटनेची जागा खूपच खास आहे. नेताजींनी २१ ऑक्टोबर १९४३ रोजी सिंगापुरमध्ये स्वतंत्र भारताचे तात्पुरत्या स्वरुपातील सरकार बनवण्याची घोषणा केली होती. तसेच आझाद हिंद सेनेचीही पुन्हा नव्याने बांधणी करुन ती आणखीन मजबूत करण्यासंदर्भातील घोषणाती त्यांनी केली होती. नेताजींनी ही घोषणा सिंगापुरमधील एका चित्रपटगृहामध्ये केली होती. नेताजींचे हे भाषण ऐकण्यासाठी आणि स्वतंत्र भारताच्या पहिल्या सरकारसंदर्भात त्यांनी दिलेली माहिती जाणून घेण्यासाठी हा चित्रपटगृहामध्ये तुडूंब गर्दी झाली होती. या ठिकाणी मुंगीला शिरायलाही जागा नव्हती.
नेताजी सुभाष चंद्र बोस झाले पंतप्रधान
नेताजी अगदी संध्याकाळी चारच्या ठोक्याला मंचावर उभे राहिले. त्यांना एक खास घोषणा करायची होती. यासाठी त्यांनी दोन दिवसांपूर्वी रात्री १५०० शब्दांचे एक भाषण तयार करुन ठेवलं होतं. “भारतातून इंग्रज आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांना हद्दपार करणे हे भारताच्या तात्पुरत्या सरकारचं प्रमुख काम असेल. भारतीयांच्या इच्छेनुसार आणि त्यांचा विश्वास संपादन करुन आझाद हिंदची कायमस्वरुपी सरकार स्थापन करण्यासंदर्भातही हे तात्पुरते सरकार काम करेल,” असं या घोषणेत सांगण्यात आलं होतं. या तात्पुरत्या सरकारमध्ये सुभाष चंद्र बोस यांनी तीन पदांचे काम पाहण्याचा निर्णय घेतला. यामध्ये पंतप्रधान पद, युद्धाशी संबंधित निर्णय आणि परराष्ट्र मंत्री अशी जबाबदारी नेताजींनी स्वत:च्या खांद्यावर घेतली. त्याचबरोबरच या सरकारमध्ये एक १६ सदस्यीय मंत्री स्तरावरील समितीही होती. भारताच्या स्वातंत्र्यासंदर्भात आपण कायम एकनिष्ठ राहू अशी शपथ नंतर सर्व सदस्यांना देण्यात आली.
…अन् नेताजींना आश्रू अनावर
नेताजी जेव्हा शपथ घेण्यासाठी उभे राहिले जेव्हा हॉलमधील प्रत्येकजण भावूक झाला होता. “ईश्वराच्या साक्षीने मी ही शपथ घेतो की भारत आणि भारतातील ३८ कोटी नागरिकांना मी स्वातंत्र्य मिळवून देईन,” असं म्हणत नेताजींनी शपथ घेतली. ही शपथ घेतल्यानंतर नेताजी भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यांमधून अश्रू पडले. त्यांनी रुमालाने आपले डोळे पुसले. नेताजींचे हे रुप पाहून हॉलमधील सर्वजण स्तब्ध उभे होते. “मी सुभाष चंद्र बोस आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत स्वातंत्र्यासाठीची पवित्र लढाई लढत राहील. मी कायम भारताची सेवा करेन. ३८ कोटी भारतीयांचे कल्याण व्हावे यासाठी काम करणे हेच माझं कर्तव्य असेल,” असं पुढे शपथ पूर्ण करताना नेताजी म्हणाले.
आणखी वाचा- KBC 12 : यंदाच्या पर्वात पहिल्या करोडपती होणाऱ्या कोण आहेत नाजिया नसीम ?
कुठे झाला हा कार्यक्रम आणि नंतर काय घडलं?
हा सर्व कार्यक्रम कॅथे चित्रपटगृहामध्ये पार पडला होता. नाझिया यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नामध्ये कॅथे चित्रपटगृह हा पहिला पर्याय (म्हणजेच ए पर्याय) होता. सुभाष चंद्र बोस यांच्या या सरकारला सात देशांनी त्वरित मान्यता दिली. यामध्ये जर्मनी, जापान, फिलीपीन्स, कोरिया, इटली, मांचुको आणि आर्यलॅण्डचा समावेश होता. जपनानने त्यांच्या ताब्यातील आंदमान आणि निकोबार बेटे सुभाष चंद्र बोस यांच्या सरकारच्या ताब्यात दिली. नेताजी तेथे गेले आणि त्यांनी आंदमानचे नाव शहीद तर निकोबारचे नाव स्वराज्य बेट असं ठेवलं. ३० डिसेंबर १९४३ ला या बेटांवर आझाद भारताचा झेंडा फडकवण्यात आला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 12, 2020 8:33 am