‘एम.एस. धोनी : द अनडोल्ट स्टोरी’ या चित्रपटात साक्षीची भूमिका साकारून अभिनेत्री कियारा आडवाणीने प्रेक्षकांना मनात घर केलं. तिचं सौंदर्य, तिचा साधा अभिनय प्रेक्षकांना खूपच आवडला. त्यानंतर ‘लस्ट स्टोरीज’ या चित्रपटामुळे तिच्या करिअरला एक वेगळंच वळण मिळालं. या चित्रपटातील एका दृश्यामुळे कियारा चर्चेचा विषय ठरली. ‘लस्ट स्टोरीज’नंतर ‘कबीर सिंग’मध्ये प्रितीची भूमिका साकारत तिने तरुणांची मनं जिंकली. या दोन चित्रपटांचा कियाराच्या करिअरमध्ये खूप मोठा वाटा आहे आणि याच दोन चित्रपटांमुळे गेल्या काही वर्षांत तिच्या संपत्तीत चांगलीच वाढ झाली आहे.

कियाराने २०१४ मध्ये ‘फगली’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यानंतर २०१६ मध्ये ‘एम. एस. धोनी’ या चित्रपटाने तिला खरी ओळख मिळवून दिली. या चित्रपटानंतर तिने कधी मागे वळून पाहिलंच नाही. ‘लस्ट स्टोरीज’मध्ये आव्हानात्मक भूमिका साकारल्यानंतर कियाराला ‘भारत अने नेनू’, ‘कलंक’, ‘कबीर सिंग’, ‘गुड न्यूज’ या चित्रपटांमध्ये भूमिका मिळाल्या. ‘रिपब्लिक वर्ल्ड’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, कियाराची एकून संपत्ती जवळपास २१ कोटी इतकी आहे.

कियाराचा नेटफ्लिक्सवरील ‘गिल्टी’ हा चित्रपटसुद्धा चर्चेत राहिला. भविष्यातही कियाराकडे अनेक चित्रपटांचे ऑफर्स आहेत. ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘शेरशाह’मध्ये झळकणार आहे. त्याचसोबत ‘भुलभुलैय्या २’, ‘इंदू की जवानी’ आणि ‘लक्ष्मी बॉम्ब’ हे तिचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.