पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या ही जणू नित्याचीच बाब झाली आहे. कल्याण- डोंबिवलीतील रस्त्यांची दुर्दशा झाली असून डांबरी रस्त्यांची अक्षरश: चाळण झाल्याने नागरिक हवालदिल झाले आहे. आरजे मलिष्कानंतर आता विनोदवीर कुशल बद्रिकेनं रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून कुशलने कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेच्या कारभारावर उपरोधिक टोला लगावला आहे.

कुशल बद्रिकेची फेसबुक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ‘आमच्या डोंबिवलीचे रस्ते बनवताना खडीसोबत डांबर न वापरता साखर वापरली असावी बहुतेक..पाण्यात विरघळली.. KDMC rocks once again,’ अशा शब्दांत कुशलने शालजोडीतला प्रहार केला आहे.
‘चला हवा येऊ द्या’ या मालिकेतून कुशल आपल्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांना खळखळून हसवतच असतो. आता या उपरोधिक फेसबुक पोस्टच्या माध्यमातूनही त्याने केडीएमसीच्या भोंगळ कारभारावर चिमटे काढले आहेत.

गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून रस्त्यातील खड्डे, उंचसखलपणा आणि नियोजनहीन पद्धतीने बसवण्यात आलेले पेव्हरब्लॉक यामुळे पाच जणांना जीव गमवावा लागला आहे. कल्याण- डोंबिवलीतील रस्त्यांची निकृष्ट कामं आणि त्यामुळे पडणाऱ्या खड्ड्यांवरून केडीएमसीतील राजकारणसुद्धा चांगलंच तापलं आहे.