दक्षिणेकडे दोन मातब्बर अभिनेत्यांनी एकाच वेळी राजकारणात प्रवेश केला. आणि मराठीत वेळोवेळी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपासून आता सेन्सॉरशिपच्या मुद्यापर्यंत आपली भूमिका ठामपणे मांडणारे अभिनेता नाना पाटेकरही राजकारणात प्रवेश करणार की कोय, याची चाचपणी होऊ लागली. ‘आपला मानूस’ या चित्रपटाच्या निमित्ताने मराठीत पुन्हा एका वेगळ्या भूमिकेतून लोकांसमोर येणाऱ्या नानांनी खरे तर, मी अण्णालाही.. (रजनीकांत) राजकारणात जाऊ नकोस असा सल्ला दिला होता, असं सांगत आपण कधीही राजकारणात शिरणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त केला. ‘आपला मानूस’ या हिंदीतील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण याची पहिलीच निर्मिती असलेल्या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेते नाना पाटेकर पुन्हा एकदा मोठय़ा पडद्यावर येण्यास सज्ज झाले आहेत. विविध छटा असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिका साकारून याआधीही नाना पाटेकरांनी रसिकांची दाद मिळविली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना वेगळी लकब असणाऱ्या मारुती नागरगोजे या सीआयडी तपास अधिकाऱ्याच्या भूमिकेत पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रोमो लॉन्च सोहळा मुंबईत पार पडला. यानिमित्ताने बोलताना नाना पाटेकरांनी विविध सामाजिक, राजकीय आणि कलाक्षेत्रातील विषयांवर चौफेर भाष्य केले. चित्रपटाच्या निमित्ताने होणाऱ्या भेटीत समाजातील न पटणाऱ्या गंभीर मुद्यांविषयी मनात असलेली खदखद माध्यमांसमोर बोलता येते, असे सांगणाऱ्या नानांशी केलेली ही बातचीत..

  • ‘पद्मावत’, ‘न्यूड’सारख्या आशयघन चित्रपटांना वेगवेगळ्या पद्धतीने सेन्सॉरशिपचा सामना करावा लागला..

माझ्या मते सेन्सॉरशिप ही गोष्ट प्रत्येक  दृक्श्राव्य गोष्टीवर लागू असणे आवश्यक आहे. तरच तो समान कायदा होईल. आम्ही कलाकार मंडळींनी सिनेमा तयार करायचा आणि त्यामधील दहा गोष्टी खळबळजनक आहेत म्हणून त्यावर ‘सेन्सॉर’च्या नावाखाली कात्री लावायची हे चुकीचे आहे. सरसकट सर्वच माध्यमांवर सेन्सॉरशिप आणणे गरजेचे आहे. टेलिव्हिजनवर होणाऱ्या चर्चेत अनेकवेळा राजकारणी मंडळी संतापजनक आणि समाज पेटवणारी वक्तव्ये करतात. ही संपूर्ण चर्चा थेट प्रक्षेपित होत असते. अशावेळी त्या ठिकाणी सेन्सॉरशिप का लागू केली जात नाही. त्यामुळे चित्रपटामुळे केवळ समाजाचे स्थर्य बिघडते अशा विचाराने जर सेन्सॉरशिपच्या नावाखाली चित्रपटाला अडकवले जात असेल, तर ते माझ्या मते चुकीचे आहे.

  • ‘आपला मानूस’चं वेगळेपण नेमकं कशात आहे?

‘आपला मानूस’ही जरी रहस्यकथा असली तरी त्यातला ‘मानूस’ हा सरतेशेवटी आपला वाटायला लागतो. सुरुवातीला त्या माणसाचा राग येतो, त्याविषयी चीड येते. तो आपला शत्रू आहे, असे वाटू लागते. मात्र चित्रपट संपल्यावर त्याचे वेगळे चित्र आपल्यासमोर उभे राहते. ‘प्रकाश बाबा आमटे’, ‘नटसम्राट’नंतर बऱ्याच कालावधीच्या अंतराने मी प्रेक्षकांसमोर येणार आहे. तुम्ही सतत एखाद्याच्या समोर राहिलात तर तुमची किंमत काही काळानंतर कमी होत जाते. त्यामुळे सातत्याने प्रेक्षकांसमोर येणं मी टाळतो. त्यापेक्षा निवडक व्यक्तिरेखांच्या माध्यमातून उत्तम, दर्जेदार अनुभव प्रेक्षकांना देण्याकडे माझा कल असतो. ‘आपला मानूस’मध्ये मला तो दर्जा दिसला म्हणून या चित्रपटाद्वारे पुन्हा  प्रेक्षकांसमोर येण्यास तयार झालो आहे. शिवाय सतीश राजवाडेसारख्या नव्या विचारांचा, अतिशय सृजनात्मक असलेला आणि आपल्या कलाकृतीवर ठाम विश्वास असलेल्या दिग्दर्शकाबरोबर काम करायला मिळत असल्याने हे पाऊल उचलले. या चित्रपटाचे वैशिष्टय़ म्हणजे तो एका जॉनरमध्ये रेंगाळत न बसता विविध मार्गाने आपल्याला चित्रपटाच्या कथानकात गुंतवून ठेवतो आणि  चित्रपट संपल्यानंतर सुन्न मनाने आपल्याला चित्रपटागृहाबाहेर पडण्यास भाग पाडतो.

  • याआधी साकारलेल्या पोलिसी व्यक्तिरेखा आणि नागरगोजे यात नेमका काय फरक आहे?

नागरगोजे हा तिरसट स्वभावाचा आहे. तपास अधिकारी असल्याने तो विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरे कधीही सरळ देत नाही. आपल्या बोलण्याने तो समोरच्या व्यक्तीला अधिक गुत्यांत टाकतो. टोचून बोलणारा असला तरी त्याचा स्वभाव गंभीर नाही. शिवाय त्याची पाश्र्वभूमी ग्रामीण असल्याने त्याच्या बोलण्याला ग्रामीण भाषेच्या लहेज्याची किनार आहे. तो चांगला मित्रही आहे. मात्र एका कालावधीनंतर त्याची दहशत बसल्याने त्याची भीती वाटू लागते. मात्र शेवटाला त्याचे वेगळे रूपही पाहावयास मिळते.

  • तुमचा ‘आपला मानूस’ कोण?

समाजात राहणारी सगळीच माणसं ही माझी-आपली आहेत. जातिभेदाच्या पलीकडे जाऊन संपूर्ण समाज हा ‘आपला मानूस’ म्हणून मी स्वीकारला आहे. त्यामुळे ज्यावेळी समाजामध्ये एखादी विघातक गोष्ट घडत असते, तेव्हा त्याचा त्रास होतो. मग त्यावेळी वेळोवेळी मी भाष्य करतो. काही मूठभर राजकारणी मंडळी ज्यांचे राजकीय स्थैर्य डगमगले आहे, ती मंडळी काहीतरी समाजघातक प्रतिक्रिया देऊन समाजाला चिथावण्याचे काम करतात. जातिभेदाच्या भिंती घालून आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न हीच मंडळी करतात. त्यावेळी आपण स्वत: वापरले जात आहोत, याची जाणीव आपल्याला होत नाही. मुख्य म्हणजे तरुण वर्ग यामध्ये भरडला जाऊन तो या संपूर्ण वातावरणाचा केंद्रबिंदू बनतो. रोजगाराच्या प्राप्तीपोटी तरुणांमधील हिसकावून घेण्याची हव्यासी वृत्ती वाढत आहे. त्यामु़ळे या तरुणांचा विकास साधण्याच्या दृष्टीने कोणीही काही बोलत नाही. अशावेळी तरुणांना चिथावल्यानंतर त्यांच्या मनात खदखदणाऱ्या असंतुष्ट भावनेचा उद्रेक होतो. आणि हातात दगड घेऊन, तो कोणावर तरी भिरकावून रागाचा निचरा करण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे वरवरची मलमपट्टी करून चालणार नाही. सातत्याने तुमच्याभोवती अघटित घडत असते, त्यावेळी भाष्य करणे गरजेचे आहे. समाजात ज्यावेळी असमाधानाचे वातावरण असते त्यावेळी एक कलाकार म्हणून माझी समाजाला हसवण्याची जबाबदारी असते. नाटकाच्या सादरीकरणावेळी समोर पसरलेल्या अंधारामध्ये आम्ही आनंद शोधत असतो. असाच अंधार सध्या समाजामध्ये पसरला असून त्यामध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो आहे.

  • रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश केला.. तुम्ही त्या दृष्टीने काही विचार केला आहे का?

रजनीकांत यांच्यासोबतच नुकत्याच एका चित्रपटाचे चित्रीकरण मी पूर्ण केले. त्यावेळीच त्यांनी राजकारणात प्रवेश करण्यासंबंधीची कल्पना मला दिली होती. मात्र राजकारणात जाऊ नये असा सल्ला मी त्यांना दिला होता. कारण रजनीकांत यांचा चाहता वर्ग त्यांच्यावर अफाट प्रेम करत असल्याने, राजकारणातील सहकाऱ्यांच्या हातून एखादी चूक घडली तर, त्याची पूर्ण जबाबदारीही त्यांच्यावर येईल. रजनीकांत हा माणूस साधाभोळा आहे. त्यांना राजकारणातल्या कोलांटउडय़ा मारणे शक्य नाही. मात्र सरतेशेवटी हा त्यांचा निर्णय असल्याने भविष्यात त्यांच्या हातून चांगले काम घडले तर माझे मत खोटेही ठरेल. मी मात्र क धीही राजकारणात जाणार नाही.