चौसष्ट कलेची देवता अशी ओळख असलेला लाडका गणराया लहान मुलांचा सर्वात आवडता देव. गणरायाच्या आगमनाचे या बालमित्रांना कायमच वेध लागलेले असतात. अनेकांसाठी तो आपला लाडका बाप्पा असतो तर काही जणांसाठी तो खास दोस्तही असतो. बाप्पाच्या आगमनाच्या तयारीत प्रत्येक मंडळात छोटे गणेशभक्त कायम सज्ज असलेले बघायला मिळतात मग अशा वेळी सूर नवा ध्यास नवा मधील छोटे सूरवीर तरी कसे मागे राहणार. या सूरवीरांनीही आपल्या गणेश मंडळाची स्थापना केली आणि अतिशय दणक्यात गणरायाचं स्वागत केलं. छोट्या कलाकारांच्या गायकीने आणि गणेशगीतांनी सजलेला हा गणपती विशेष भाग १७, १८ आणि १९ सप्टेंबर रोजी रात्री साडे नऊ वाजता कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

आपल्या गाण्याने सर्वांची मने जिंकणारा नागपूरचा उत्कर्ष वानखेडे इतरही कलांमध्ये पारंगत आहे. तो एक उत्तम मूर्तिकार आहे. उत्कर्षचे आजोबा आणि वडील हे सुद्धा दरवर्षी स्वतःच शाडूच्या मातीची गणेशमूर्ती बनवतात. उत्कर्ष त्यांच्याकडूनच ही कला शिकला. त्यामुळे सूर नवा ध्यास नवासाठीही उत्कर्षने एक खास मूर्ती तयार केली. उत्कर्षने ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर बाकीच्या बच्चेकंपनीनेही उत्साह दाखवित इतर सजावटीची जबाबदारी उचलत हार, पताकेपासून रांगोळीपर्यंत सर्व सजावट स्वतःहून केली.

आपल्या गायकीने केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभरात आपले चाहते ज्यांनी तयार केले असे गायक म्हणजे महेश काळे. आपल्या सुरांच्या जादूने ते प्रेक्षकांना कायम मंत्रमुग्ध करतात. महेश काळेंच्या सुरांची हीच अनुभती या गणपती विशेष भागामधून प्रेक्षकांना येणार आहे. ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटातील ‘सूर निरागस हो’ या गाण्यामधून त्यांनी गणरायाला सुरांजली वाहिली. मंगळवारी प्रसारित होणा-या भागामधून प्रेक्षकांना या गाण्याचा आनंद घेता येणार आहे.