मराठी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड ठरलेल्या नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटाचा हिंदी रिमेक येणार असल्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून होती. बॉलिवूडमधील आघाडीचा दिग्दर्शक, निर्माता करण जोहर ‘सैराट’ रिमेकची निर्मिती करणार असून, जान्हवी कपूर आणि ईशान खत्तर या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत. रिमेकसाठी करण कोणतीच कसूर ठेवू इच्छित नाही. यासाठी त्याने दिग्दर्शक नागराज मंजुळे याची मदत मागितल्याचे कळते. ‘सैराट’ रिमेकचे दिग्दर्शन करणाऱ्या दिग्दर्शक शशांक खैतानला नागराजने मार्गदर्शन करावे अशी त्याची आहे. पण, नागराजने त्याला मदत करण्यास नकार दिल्याचे कळते.

वाचा : सलमानच्या बाप्पाची पहिल्यांदाच होणार बहिणीच्या घरी प्राणप्रतिष्ठा; अशी करण्यात आलीय आगमनाची तयारी

‘डीएनए’ने दिलेल्या वृत्तानुसार, नागराज सध्या अमिताभ बच्चन यांच्यासोबत हिंदी चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे. पण करणला नकार देण्यामागे केवळ हे एकच कारण नाहीये. ‘सैराट’चा रिमेक भव्य असावा अशी करणची इच्छा आहे. त्यासाठी त्याने चित्रपटात बरेच बदलही केलेत. चित्रपटात श्रीमंत मुलीची भूमिका साकारणारी जान्हवी ही गावातील न दाखविता शहरातील दीवाच्या लूकमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल. तर दुसरीकडे परश्याची भूमिका साकारणारा इशान गरीबच पण मस्क्युलर लूकमध्ये दिसेल. त्यामुळे दोन्ही पात्र कथेच्या अगदी विपरीत असतील. ‘डीएनए’ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीदेवीसारख्या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलीला गावरान मुलीच्या वेषात कसे दाखवणार? उलट जान्हवी वेस्टर्न कपड्यांमध्ये अधिक खुलून दिसेल असा चित्रपटाच्या निर्मात्यांचा आणि दिग्दर्शकाचा विचार आहे. याच कारणामुळे नागराने स्वतःला ‘सैराट’च्या रिमेकपासून चार हात लांब ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे कळते.

वाचा : या मराठी अभिनेत्याने घरातच साकारली इको फ्रेंडली गणेशमूर्ती

‘सैराट’ने मराठी चित्रपटसृष्टीला रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर हे दोन नवीन कलाकार दिले. याच्या कन्नड रिमेकमध्येही रिंकूनेच काम केले होते. नागराच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास १०० कोटींचा गल्ला तर जमवलाच पण देशाबाहेरही चित्रपटाची प्रशंसा करण्यात आलेली.