16 October 2019

News Flash

तनुश्री दत्ता लैंगिक छळ प्रकरणी नाना पाटेकरांना क्लीन चीट

प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्या कारणाने पोलिसांनी नाना पाटेकर यांना क्लीन चीट दिली आहे

अभिनेता नाना पाटेकर आणि अभिनेत्री तनुश्री दत्ता यांच्यात सुरु असलेल्या वादाला आता नवं वळण मिळालं आहे. तनुश्री दत्ताचा लैंगिक छळ केल्याच्या कथित प्रकरणात नाना पाटेकर यांना दिलासा मिळाला आहे. नाना पाटेकर यांच्या विरोधात आरोप सिद्ध करणारा एकही साक्षीदार पोलिसांना मिळालेला नाही. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्या कारणाने पोलिसांनी नाना पाटेकर यांना क्लीन चीट दिली आहे. तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्याविरोधात ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. बॉलिवूडलाईफ.कॉम ने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

तनुश्री दत्ताने केलेल्या आरोपांनंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. पोलिसांनी त्यावेळी उपस्थित असणाऱ्या १५ साक्षीदारांची चौकशी केली होती. तनुश्री दत्ताने केलेले आरोप सिद्ध करणारा एकही साक्षीदार आम्हाला सापडलेला नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे. एकाही साक्षीदाराने लैंगिक छळाला दुजोरा दिला नसल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी ज्या १५ साक्षीदारांची चौकशी केली त्यामध्ये अभिनेत्री डेजी शाहचाही समावेश होता.

पोलिसांनी क्लीन चीट दिल्यानंतर तनुश्री दत्ताने प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, ‘हे १५ साक्षीदार कोण होते ? ते माझ्या बाजूने होते की नाना पाटेकरांच्या ? ते नाना पाटेकरांचे मित्र आहेत. मग ते मला समर्थन कसे देतील. माझा छळ झाला होता हे सिद्ध करण्यासाठी साक्षीदारांची गरज नाही. जेव्हा छळाचा प्रश्न येते तेव्हा अनेकदा ते न्यायालयात सिद्ध करणं कठीण जातं. पोलिसांनी अत्यंत धीम्या गतीने तपास केला. पोलिसांनी ज्यांची साक्ष नोंदवली आहे त्यापैकी अनेकांनी माझा छळ होताना पाहिला, पण मदतीसाठी पुढाकार घेतला नाही. मग ते आता माझ्या समर्थनार्थ का बोलतील ? अशा लोकांची विचारसरणीच अशी आहे की एका गुन्हेगाराला पाठिंबा देतील आणि महिलेला खोटं ठरवतील’. मीड-डेशी बोलताना तनुश्री दत्ताने ही प्रतिक्रिया दिली.

यावेळी तनुश्री दत्ताने साक्षीदारांना धमकावलं जात असल्याचाही आरोप केला. ‘साक्षीदारांना धमकावलं जात असल्या कारणाने त्यांना जबाब नोंदवण्यासाठी तयार करताना खूप अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे जे खरे साक्षीदार आहेत ज्यांना सत्य माहित आहे त्यांना घाबरवलं जात असून खोटं बोलणाऱ्यांना उभं केलं जात आहे. पण मला अजूनही विश्वास आहे की आरोपींना शिक्षा मिळेल. कारण मी फक्त माझ्यासाठी नाही तर रोज शांतपणे अन्याय सहन करणाऱ्या प्रत्येकासाठी लढत आहे’, असं तनुश्री दत्ताने सांगितलं आहे.

First Published on May 16, 2019 8:48 pm

Web Title: nana patekar gets clean chit in tanushree dutta sexual harrasment case