गैरवर्तणुकीचा आरोप करणाऱ्या अभिनेत्री तनुश्री दत्ताला नाना पाटेकर कायदेशीर नोटीस पाठवणार आहे. ‘तनुश्रीनं केलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे आहेत. तिनं खोटी माहिती पुरवली आहे त्यामुळे तिला आम्ही कायदेशीर उत्तर देऊ’, अशी माहिती नाना पाटेकर यांचे वकिल राजेंद्र शिरोडकर यांनी दिली आहे.

अमेरिकेहून नुकत्याच भारतात परतलेल्या अभिनेत्री तनुश्री दत्ता हिनं अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तन केल्याचा खळबळजनक आरोप केला होता. #metoo मोहीमेबद्दल बोलताना तिनं नानांनी केलेल्या असभ्य वर्तनावर भाष्य केलं. २००८ साली ‘ हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटादरम्यान नानांनी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असभ्य वर्तन केलं असा आरोप तिनं मुलाखतीत केला होता.

नाना पाटेकर सेटवर अभिनेत्रींशी असभ्य वर्तन करतात, अनेकींना त्यांनी मारहाण केली आहे. इण्डस्ट्रीतल्या सगळ्यांनाच त्यांच्या या स्वभावाची कल्पना आहे, मात्र त्यांच्याविरुद्ध बोलण्याची हिंमत कोणीच करत नाही, असं तनुश्री ‘झूम टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली. असभ्य वर्तन करणाऱ्या नानाविरुद्ध आवाज उठवल्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबियांना गुंडाकरवी धमकावल्याचा आरोपही तिनं केला होता.

यावर नाना पाटेकर तिला कायदेशीर उत्तर देणार आहे. ‘तनुश्रीनं खोटे आरोप केले आहेत तसेच ती खोटं बोलली आहे. त्यामुळे तिनं नाना पाटेकर यांची बदनामी केल्याप्रकरणी माफी मागवी यासाठी आम्ही तिला कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याची माहिती नाना पाटेकर यांच्या वकिलानं दिली आहे.

नाना यांनी खासगी वाहिनीला दिलेली प्रतिक्रिया
‘सेटवर १०० – २०० लोक उपस्थित होते मग सर्वांसमोर मी तिच्याशी गैरवर्तणूक केलं असं ती का म्हणतेय, कोणी काय बोलायचं हे आपण कसं ठरवणार, कोणी काहीही म्हटलं तरी मला जे आयुष्यात करायचं आहे तेच मी करणार’ अशी प्रतिक्रिया नाना पाटेकर यांनी ‘टाइम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

कोरिओग्राफर गणेश आचार्य आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीवरही आरोप
दरम्यान तनुश्रीनं दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीवरही गैरवर्तणुक केल्याचे आरोप केले आहे. तर तनुश्रीचे आरोप फेटाळून नाना पाटेकर यांच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या गणेश आचार्यलाही तिनं खोटारडा ठरवला आहे. नानांनी माझ्यासोबत गैरवर्तन केलं यात गणेश आचार्यही सहभागी होता तो अत्यंत खोटारडा आणि दुटप्पी माणूस आहे असा पलटवार तिनं केला आहे.