आपल्या अभिनयाने नाना यांनी रसिकांची मने जिंकली आहेत. आजच्या घडीला नानासारखा नट होणे नाही असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. पण या प्रसिद्ध नटाला एकेकाळी सिगारेट ओढण्याचे व्यसन होते. मात्र, आपल्याला त्या गोष्टीमुळे त्रास होत असल्याचे जाणताच त्यांनी हे व्यसन एका क्षणात सोडलेही. झोप येण्यासाठी मला दारूची गरज लागत नाही असे नाना ठामपणे सांगतात. लोकसत्ताला काही वर्षांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत नानांनी याबाबतचा खुलासा केला होता.

त्या मुलाखतीत नाना म्हणालेले की, सबकॉन्शस लेव्हलला मी वेगवेगळ्या गोष्टी करत राहतो. मी विमानात बसल्यावर शक्यतो कॉकपीटमध्ये बसतो. तिथे पायलट काय करतात ते बघत राहतो. सबकॉन्शस लेव्हलला ते झिरपवत ठेवतो. म्हणजे कधी मला पायलटची भूमिका करावी लागली तर ती सहज होऊन जाईल. हे मी सतत करत राहतो. ‘मोकळा वेळ आहे ना झोपू या’ असं माझ्या मनात अजिबात येत नाही. रात्री पडल्या पडल्या एका क्षणात मला झोप लागते. त्यासाठी दारू प्यावी लागत नाही. सिगारेटने मला त्रास व्हायला लागला. दिली एके दिवशी फेकून. त्याला आज पाच वर्ष झाली. एकेकाळी मी दिवसाला आठ सिगारेट ओढायचो. व्यायाम मी रोज दोन तास करतोच करतो. अजून एकावेळी दोन-तीन माणसं आली, तर मी अंगावर घेऊ शकतो. तेवढी ताकद आहे. रस्त्यात एखादी घटना घडली तर गाडी थांबवून तिथे जायची शामत आहे माझी.

..आणि मला साक्षात्कार झाला!
मी कुठेच एका ठिकाणी फार काळ रुजलो नाही. त्यामुळे खरा नाना कोणता हा प्रश्नच मला पडला नाही आणि कुठे तरी स्थिर झालो, तर मला असं वाटेल की मी चुकलो आहे. वडासारखं असलं पाहिजे. कुठे रुजलं आहे तेच कळत नाही, पारंबीचाही वृक्ष होतो तसं माझं झालं. म्हणजे जे.जे.मधून बाहेर पडलो. मग बाबा आमटे आल्यानंतर वेगळं झालं किंवा ‘प्रहार’ चित्रपटाची गोष्ट डोक्यात असताना आर्मीत प्रवेश करावासा वाटला.. मग तीन वर्षे तिथे होतो. या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला काय पाहिजे आहे, ते समजलं.