लोकप्रिय गायिका नेहा कक्कर आणि हिमांश कोहली यांचा ब्रेकअप होऊन बराच काळ लोटला आहे. मात्र आजही त्यांच्याविषयीच्या चर्चा चाहत्यांमध्ये रंगत असतात. अलिकडेच झालेल्या एका मुलाखतीमध्ये हिमांशने त्यांच्या ब्रेकअपबद्दल चर्चा केली. यामध्ये त्याने त्यांच्या नात्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. परंतु ही गोष्ट नेहाला फारशी पटलेली दिसत नाही. तिने अप्रत्यक्षरित्या हिमांशला खडेबोल सुनवत संताप व्यक्त केला आहे.
नेहाने इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर करत मोठी पोस्ट लिहिली आहे. यामध्येच तिने हिमांशवर राग व्यक्त केला आहे. “लव यू गुड्डू. देवाच्या कृपेने आज मला ज्या गोष्टींची आवश्यकता आहे ती प्रत्येक गोष्ट मिळाली आहे. मी आज खूप आनंदात जगतेय याचंच मला समाधान आहे आणि मला हे आयुष्य मिळालं ते माझ्या कामामुळे. जे माझ्यावर टीका करतात किंवा माझ्याविषयी खोटं बोलतात ते केवळ प्रकाशझोतात येण्यासाठी हे सारं करतात. यापूर्वीदेखील अनेकांनी माझ्या नावाचा वापर करुन प्रकाशझोतात येण्याचा प्रयत्न केला आहे”, असं नेहा म्हणाली.
पुढे ती म्हणते, “माझ्या नावाचा वापर करुन जे प्रकाशझोतात आले आहेत. खरंतर ते माझ्यामुळे नाही त्यांच्या कर्मामुळे चर्चेत येत आहेत. मात्र पुन्हा चर्चेत राहण्यासाठी माझ्या नावाचा वापर करु नका. नाही तर तुझे आई-वडील आणि बहिणी माझ्यासोबत ज्या पद्धतीने वागले किंवा मला जी दुषणं लावली त्याचा उद्धार येथे करण्यास मी मागे-पुढे पाहणार नाही. यापुढे कधीही माझ्या नावाचा वापर करण्याची हिंमत करु नकोस. तसंच जगासमोर भोळा असल्याचं आणि मला खोटं पाडण्याचं नाटकंही करु नकोस. माझ्यापासून आणि माझ्या नावापासून दूर रहा”.
वाचा : कियाराच्या टॉपलेस फोटोशूटचे भन्नाट मीम्स व्हायरल
दरम्यान, नेहासोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय माझा नव्हता तर तो सर्वस्वी निर्णय नेहाचा होता. त्यावेळी अशा बऱ्याच गोष्टी घडल्या होत्या ज्या मी सांगू शकत नाही. फक्त एवढंच सांगू शकतो की तिला हे नातं पुढे न्यायचं नव्हतं. त्यामुळेच आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला, असं हिमांशने झालेल्या मुलाखतीत सांगितलं. हिमांशसोबत ब्रेकअप झाल्यानंतर नेहा तिच्या आयुष्यात पुढे गेली आहे. सध्या ती छोट्या पडद्यावरील ‘इंडियन आयडल’ या शोच्या परीक्षकपदाची जबाबदारी पार पाडत आहे. तर याच शोचा सूत्रसंचालक आदित्य नारायण याला ती डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे.