बॉलिवूडवर अभिनेत्यांची मक्तेदारी आहे आणि नायिका नेहमी दुय्यम भूमिकेत असते हे सत्य आघाडीच्या अभिनेत्रींनी पचविले आहे. तरीही विद्या बालनच्या चित्रपटांना मिळालेल्या यशानंतर नायिकाप्रधान चित्रपटांची एकच लाट सध्या बॉलिवूडमध्ये आली आहे.
गेल्या वर्षी दीपिका पदुकोणने व्यावसायिक चित्रपटांतूनही चांगली कमाई करीत आपलं वर्चस्व गाजवलं. एकाचवेळी शाहरूख आणि रणवीर अशा दोन बडय़ांबरोबर काम करून दीपिकाच्या चित्रपटांनी १०० कोटींची कमाई केली. यावर्षी कंगना राणावतच्या ‘क्वीन’नेही मोठी कमाई करता ‘जोर का झटका’ दिला. कंगनाने पाठोपाठ ‘रिव्हॉल्वर रानी’ केला. त्यातही ती प्रमुख भूमिकेत होती. ‘क्वीन’ने तीन दिवसांत दहा कोटींची कमाई केली. पाठोपाठ आलेल्या विद्या बालनच्या ‘बॉबी जासूस’ने सात कोटींच्या आसपास कमाई केली. ‘बॉबी जासूस’मध्ये विद्या बालनसमोर नायक म्हणून तुलनेने अगदीच नवखा अली फजल असूनही या चित्रपटाने चांगली कमाई केली. या आठवडय़ात प्रदर्शित झालेया राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी’नेही तीन दिवसांत १७ कोटी रुपयांची कमाई करीत आधीच्या चित्रपटांवर कडी केली आहे.
‘मर्दानी’पाठोपाठ प्रियांका चोप्राची मुख्य भूमिका असलेला ‘मेरी कोम’ येत असून त्यानंतर बिपाशा बासूचा ‘क्रिएचर थ्रीडी’ हा आतापर्यंतचा सर्वात वेगळा चित्रपट येणार आहे. त्यानंतर सोनम कपूरची मुख्य भूमिका असलेला  ‘खूबसूरत’ प्रदर्शित होणार आहे. या सगळ्या चित्रपटांमध्ये नावाजलेल्या नायिका प्रमुख भूमिकेत असताना त्यांच्यासमोर नायक म्हणून तरूण कलाकार आहेत.
तरूण कलाकारांसोबत काम करणेच चांगले असते, असे मत यासंदर्भात बिपाशा बासूने व्यक्त केले. स्त्री-पुरुष भेदभाव आपल्या चित्रपटांमध्ये अजूनही आहे. त्यामुळे नायिकाप्रधान चित्रपटांना नावाजलेले अभिनेते मिळत नाहीत. नायिकेभोवती चित्रपट फिरत असला तरी त्यांना मिळणारे मानधन कमीच असते. अशा वेळी तरूण कलाकारांसोबत काम करूनही चित्रपटाचा विषय चांगला असेल तर यश नक्की मिळते, असे बिपाशा म्हणाली. तर मेरी कोमसारखा आव्हानात्मक चित्रपटाची जबाबदारी माझ्या एकटीच्या खांद्यावर आहे याचे दडपण आले आहे. पण आताचे दिग्दर्शक नायिकांवर एवढा विश्वास टाकत असल्यामुळे असे चांगले चित्रपट आमच्या वाटय़ाला येतात याचा जास्त आनंद वाटतो, असे प्रियांका चोप्राने सांगितले. राणी मुखर्जीनेही चित्रपटाचा आशय चांगला असेल तर अभिनेत्रीही त्याला न्याय मिळवून देऊ शकतात हे कहानी, बर्फी अशा चित्रपटांनी सिद्ध केले आहे, असे सांगितले. एकूणच या वर्षभरात सुपरस्टार नायकांच्या बरोबरीनेच सुपरस्टार नायिकांचेही चित्रपट दणक्यात झळकत असून सुपरस्टार अभिनेत्यांच्या चित्रपटांना नायिकाप्रधान स्टार अभिनेत्रींच्या चित्रपटांशी स्पर्धा करावी लागत आहे.