अभिनेत्री आणि ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोची माजी स्पर्धक पायल रोहतगी हिचं ट्विटर अकाऊंट बंद झालंय. नियमभंग केल्याने बुधवारी ट्विटरने ही कारवाई केली आहे. पायल सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते आणि तिच्या वादग्रस्त पोस्टमुळे ती चर्चेत असते. अकाऊंट बंद झाल्याचा स्क्रीनशॉट इन्स्टाग्रामवर पोस्ट करत तिने चाहत्यांना विनंती केली आहे. ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरू करण्यासाठी मदत करा, असं आवाहन तिने फॉलोअर्सना केलं आहे.

“थोड्या वेळापूर्वी मला समजलं की माझं ट्विटर अकाऊंट सस्पेंड झालंय. मला त्याचं कारण सांगण्यात आलं नसून माझ्या इमेल आयडीवर कोणताच मेलसुद्धा आला नाही. माझं अकाऊंट बंद करण्यामागचं कारण काय आहे, हेच मला कळत नाहीये. त्यामुळे माझं अकाऊंट का सस्पेंड केलं याचा जाब तुम्ही ट्विटर इंडियाला विचारा”, असं ती या व्हिडीओत म्हणतेय.

सोशल मीडियावर कधीच अर्वाच्च किंवा अश्लील भाषा वापरली नसल्याचंही तिने स्पष्ट केलं. “ट्विटरवर नियंत्रण ठेवणाऱ्या कट्टरवाद्यांनी नेहमीच मला चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर मांडलंय. मी लोकांना विनंती करते की तुम्ही माझं अकाऊंट पुन्हा सुरू करून द्या”, असं ती पुढे म्हणाली.

पायलच्या या व्हिडीओनंतर ट्विटरवर ‘#BringBackPayal’ हा हॅशटॅग ट्रेण्ड होऊ लागला. जूनमध्येही तिचा अकाऊंट बंद झाला होता. एका आठवड्यासाठी तिचा अकाऊंट बंद करण्यात आला होता. आता महिन्याभरात ही दुसरी घटना आहे.