विनोद काप्री दिग्दर्शित ‘पीहू’ या चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी प्रदर्शित झाला आणि या ट्रेलरमध्ये झळकलेल्या दोन वर्षीय मुलीने प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवला. आईच्या मृत्यूनंतर दोन वर्षांची मुलगी एकटी घरात काय काय करू शकेल आणि कोणत्या परिस्थितीतून जाईल हे जिथं विचार करणंसुद्धा अवघड आहे. दोन वर्षांची चिमुकली पीहू अशाच परिस्थितीतून जात असल्याचं या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं. अंगावर काटा आणणाऱ्या या ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. दोन वर्षांच्या मायरा विश्वकर्माने ‘पीहू’ची भूमिका साकारली असून नेटकऱ्यांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

एखाद्या चित्रपटाच्या यशासाठी बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात. त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे ट्रेलर. चित्रपटाच्या ट्रेलरवरून बहुतांश प्रेक्षक तो चित्रपटगृहात जाऊन पाहावा की पाहू नये हे ठरवतात. हीच बाब ओळखून आगामी ‘पीहू’च्या निर्मात्यांनी हा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. जवळपास दोन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये एक छोटीशी मुलगी घरात एकटी असताना काय काय करते हे दाखवण्यात आलं आहे. अकस्मात तिच्या आईचा मृत्यू आणि त्यानंतरचा छोट्या पीहूचा प्रवास या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो. तिचं फ्रीजमध्ये जाऊन बसणं, गॅस पेटवणं, मायक्रोवेव्ह ऑन करणं आणि त्यातच बेडवर निपचित पडलेल्या आईला सतत आवाज देणं पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

वाचा : मानधनाच्या बाबतीत कंगना ठरली ‘क्वीन’; दीपिकाला टाकलं मागे  

दोन वर्षांच्या मायराच्या अभिनयाने मोठमोठे कलाकार आणि नेटकरीसुद्धा भारावून गेले आहेत. इतकंच काय बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीसुद्धा तिचं कौतुक केलं आहे. अर्थात तिच्याकडून हे अभिनय करून घेण्यात दिग्दर्शकांचा मोठा वाटा आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. रोनी स्क्रूवाला आणि सिद्धार्थ रॉय कपूरने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. १६ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे.