अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला १० दिवसांहून अधिक काळ उटलून गेल्यानंतरही बॉलिवूडबरोबरच चित्रपट चाहत्यांमधील अस्वस्थता अद्यापही कायम आहे. यशाच्या शिखरावर असताना अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आयुष्य संपवण्याचा निर्णय त्याने का घेतला असेल? याचीच चर्चा सध्या सुरू आहे. वयाच्या ३४ व्या वर्षी सुशांतने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर त्याने असं का केलं हे चाहत्यांना जाणून घ्यायचं आहे. त्याचवेळी दुसरीकडे सोशल नेटवर्किंगवर बॉलीवूडमधील घराणेशाहीवरुन जोरदार वाद सुरु आहेत. मुंबई पोलीसही सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करत आहे. मागील काही दिवसांपासून सुशांतशी संबंधित अनेक लोकांची पोलीसांनी चौकसी केली आहे. असं असतानाच आता पोलिसांना सुशांतच्या सोशल मिडिया अकाउंटसंदर्भात शंका आली आहे. हीच शंका दूर करण्यासाठी पोलिसांनी आता ट्विटरकडून माहिती मागवली आहे.

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान दर दिवशी कोणती ना कोणती नवीन माहिती समोर येत आहे. पोलिसांनी २० जूनपर्यंत एकूण २३ जणांची चौकशी केली आहे. आता पोलिसांनी आपला तपास सुशांतच्या सोशल मिडिया अकाउंटकडे वळवला आहे. सुशांतच्या ट्विटवर अकाउंटवरुन काही ट्विट डिलीट करण्यात आल्याची शंका पोलिसांना आहे असं वृत्त पिंकव्हिलाने दिलं आहे. यासंदर्भात पोलीस आता चौकशी करत असून मुंबई पोलिसांनी ट्विटरला एक पत्र पाठवल्याचं वृत्तामध्ये नमूद करण्यात आलं आहे. पोलिसांनी ट्विटरकडून सुशांतच्या अकाउंटसंदर्भातील मागील सहा महिन्याची माहिती मागवली असल्याचे सांगण्यात येत आहे. सुशांतच्या ट्विटर अकाउंटवरुन शेवटचं ट्विट डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात करण्यात आल्याचं दिसत आहे.

पोलिसांनी यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचे अनेक व्हिडिओ, ट्विट आणि पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. सुशांतने इन्स्टाग्रामवर आपल्या आईबद्दल केलेली पोस्ट ही त्याची शेवटची पोस्ट ठरली. सुशांतची ही पोस्टही चांगलीच व्हायरल झाली आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या ट्विटवरील कव्हर फोटोहीची चांगलीच चर्चा सोशल मिडियावर रंगल्याचे पहायला मिळालं होतं.

पोलिसांनी आपल्या चौकशीदरम्यान सुशांतच्या डॉक्टरांपासून ते त्याची कथित प्रेयसी रिया चक्रवर्तीपर्यंत अनेकांची चौकशी केली. मागील दिवसांपासून सुशांत सोबत राहणारा त्याचा मित्र आणि रुममेट संदीप सिंहचीही पोलिसांनी चौकशी केली आहे.