डान्सर, कोरिओग्राफर, दिग्दर्शक, अभिनेता प्रभुदेवा याचा आज वाढदिवस. ‘भारतीय मायकल जॅक्सन’ म्हणून ओळखला जाणाऱ्या प्रभुदेवाने आजवर शेकडो चित्रपटांच्या गाण्यांची कोरिओग्राफी केली आहे. तर १३ चित्रपटांचं दिग्दर्शन आणि चार चित्रपटांची निर्मिती केली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता प्रभुदेवाने हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम चित्रपटांतही काम केले आहे. प्रभुदेवाचे वडील दाक्षिणात्य चित्रपटांमधील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक होते. त्यांच्याकडूनच प्रभुदेवाने नृत्याचे धडे घेतले.

प्रभुदेवाच्या नृत्याचे चाहते जगभरात आहेत. पण त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारच कमी लोकांना माहीत आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा हिच्यामुळे प्रभुदेवाचं लग्न मोडलं असं म्हटलं जातं. नयनतारा हिचे प्रभुदेवावर खूप प्रेम होते. या प्रेमापोटी तिने ख्रिश्चन धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला. बरेच वर्ष हे दोघं लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होते.

प्रभुदेवाचे रामलता यांच्याशी लग्न झाले होते. नयनताराशी असलेले संबंध उघडकीस आल्यानंतर संतापलेल्या रामलता यांनी २०१० कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली. त्याचबरोबर नयनतारापासून दूर राहण्यासाठी प्रभुदेवावर दबाव टाकण्यास सुरुवात केली. काही दिवसांनी हा वाद विकोपाला गेला आणि रामलता यांनी उपोषणाची धमकी दिली. तर अनेक महिला संघटनांनी नयनताराविरोधात आवाज उठवला.

अखेर २०११ मध्ये प्रभुदेवाने पत्नी रामलता यांना घटस्फोट दिला. मात्र त्यानंतर नयनताराने प्रभुदेवा आणि तिच्यात कोणताही संबंध नसल्याचं प्रसारमाध्यमांमध्ये स्पष्ट केले.