हिंदी असो किंवा मराठी चित्रपटसृष्टी, सध्या सर्वत्रच बायोपिकची जणू लाट आली आहे. प्रेरणादायी व्यक्तीमत्त्वांच्या कथानकाला प्रेक्षकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सध्या चित्रपटसृष्टीत बायोपिकची संख्या वाढत आहे. आता अभिनेता व दिग्दर्शक प्रसाद ओक पुढील तीन-चार वर्षांत तीन मोठे बायोपिक मराठी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. याची माहिती त्याने ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना दिली.

विक्रम फडणीस यांच्या ‘स्माइल प्लीज’ या चित्रपटात प्रसाद ओक महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या मुलाखतीत प्रसादने त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती दिली. ‘मी तीन महत्त्वपूर्ण बायोपिकवर सध्या काम करत आहे. हे तीन इतके महत्त्वपूर्ण विषय आहेत की एका बायोपिकसाठी साधारण एक ते दीड वर्ष लागेल. हे बायोपिक प्रेक्षकांचं मनोरंजन नक्की करतील,’ असं तो म्हणाला. यावेळी उपस्थित असलेली अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने मला त्यात भूमिका आहे का असा गमतीशीर प्रश्न विचारला. त्यावर प्रसादनेही होकारार्थी मान डोलावली.

प्रसाद ओकने यावेळी वेब सीरिजमध्येही काम करण्याची इच्छा व्यक्त केली. योग्य कथानक असल्यास मी वेब सीरिजमध्ये नक्की काम करेन, असं तो म्हणाला. ‘कच्चा लिंबू’ या मराठी चित्रपटातून प्रसादने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर आता ‘हिरकणी’ हा चित्रपटसुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचेही दिग्दर्शन प्रसादनेच केलं आहे.