बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते राजकुमार बडजात्या यांचं आज (गुरुवारी) सकाळी निधन झालं. मुंबईतील सर एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखरेचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या निधनानंतर चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत ही माहिती दिली. तरण आदर्श यांच्याव्यतिरिक्त राजश्री प्रोडक्शन हाऊनेही त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

“राजकुमार बडजात्या यांचं आज सकाळी निधन झालं. राजकुमार यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. राजकुमार हे अत्यंत मृदूभाषी व्यक्ती होते. त्यांच्या याच स्वभावामुळे कलाविश्वात ते ‘राजबाबू’ या नावाने ओळखले जायचे. मी त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे”, असं तरण आदर्श यांनी म्हटलं आहे.

राजकुमार बडजात्या यांच्या राजश्री प्रॉडक्शनने एकापेक्षा एक दमदार चित्रपटांची निर्मिती केली. ‘पिया का घर’, ‘प्रेम रतन धन पायो’,’हम आपके है कौन’, ‘हम साथ साथ है’, ‘विवाह’ असे अनेक चित्रपट राजश्री प्रॉडक्शनने दिले आहेत. गेल्या १५ फेबु्रवारीला राजकुमार यांची निर्मिती असलेल ‘हम चार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यांच्या पश्चात पत्नी सुधा बडजात्या आणि मुलगा सूरज बडजात्या असा परिवार आहे.