26 September 2020

News Flash

गजरेवाल्या अक्कासाहेब

वर्षांनुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर गारुड करून बसलेल्या दैनंदिन मालिकांच्या केवळ कथानकाबद्दलच नाही

| March 3, 2015 06:14 am

वर्षांनुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर गारुड करून बसलेल्या दैनंदिन मालिकांच्या केवळ कथानकाबद्दलच नाही, तर त्यांचे दिसणे, कपडे, दागिने यांच्याबद्दलही घराघरात चर्चा रंगू लागतात. ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतील अक्कासाहेब या व्यक्तिरेखेबद्दलही असेच काहीसे आहे. अक्कासाहेबांच्या साडय़ा, दागिनेच नाही, तर त्यांच्या गजऱ्यांचाही चाहता वर्ग आहे. मालिकेचे १२७० भाग पूर्ण झाले असून त्यासाठी एक-दोन नाही, तर तब्बल वीस हजार गजरे वापरले आहेत. टीव्हीवरील दैनंदिन मालिका आवडण्याबाबत प्रत्येकाची भिन्न मते असू शकतात, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. संध्याकाळी सातच्या टोल्यावर घराघरातून मालिकांचे आवाज ऐकू येतात. मराठीतील ‘पुढचं पाऊल’ ही मालिका चार वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. मालिकेतील सरदेसाई कुटुंबाचे नेतृत्व करणाऱ्या आक्कासाहेबांच्या भूमिकेने लोकांच्या मनावर गारुड केले आहे. ठळक  रंगाची बुट्टेदार साडी, तीन मंगळसूत्रे, दोन हार आणि त्यावर साजेशी टिकली; यासोबत केसांची लांबच वेणी आणि त्यात माळलेले गजरे ही त्यांची खास ओळख बनली आहे. आक्कासाहेबांची भूमिका साकारणाऱ्या हर्षदा खानविलकर भूमिकेच्या लुकबद्दल चौकस असतात. त्यामुळे साडय़ा, दागिनेच नाही, तर गजऱ्यांची संख्याही कमीजास्त झालेली त्यांना खपत नाही. आतापर्यंत या मालिकेचे १२७० भाग पूर्ण झाले आहेत, त्यानुसार सरासरी १००० दिवसांचे चित्रीकरण असा हिशोब लावला, तर आतापर्यंत आपण तब्बल वीस हजार गजरे वापरल्याचे हर्षदा सांगतात. मालिका सुरू झाल्यापासून त्यांच्या डोक्यात एका वेळेस आठ ते दहा गजरे माळले जात आहेत. दररोज सकाळी आणि संध्याकाळी असे दहा गजऱ्यांचे दोन जोड सेटवर तयार ठेवावे लागत असत. पण असे असूनही रोज ताजे गजरे सेटवर हजर असतील, याची दक्षता घेतली जाते. त्यामुळे आतापर्यंत एकदाही आपल्याला खोटा गजरा घालायची वेळ आली नसल्याचे त्या अभिमानाने सांगतात. अर्थात त्यामुळेच ‘आक्कासाहेब म्हणजे गजरे’ हे समीकरण प्रेक्षकांच्या मनातही इतके घट्ट आहे की आपण कोणत्याही कार्यक्रमाला गजरे न माळता गेले असता, तेथे उपस्थित महिला स्वत:हून आपल्यासाठी गजरे घेऊन येत असल्याचे त्या मिश्कीलीने सांगतात. इतकेच नाही, तर कित्येकजणी कार्यक्रमांना अक्कासाहेबांसारख्या तयार होऊन आपल्याला भेटायला येत असल्याचे त्या सांगतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2015 6:14 am

Web Title: pudhach paul character akka saheb used 20 thousand gajara in 1270 episodes
टॅग Television
Next Stories
1 ‘बॉलीवूड बीएफएफ’ करण जोहरसाठी करिनाचे आयटम साँग
2 बॉलीवूडवर स्वाइन फ्लूचे सावट
3 ऑस्कर बदलाची नांदी..
Just Now!
X