साधारणपणे वीस वर्षांपूर्वी ‘रहना हैं तेरे दिल में’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटातील अभिनेता आर. माधवनचा अभिनय प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात राहिला. तसंच या चित्रपटातील ‘सच कह रहा हैं दीवाना, दिल दिल ना किसी से लगाना’ हे गाणंदेखील तुफान गाजलं. आजही हे गाणं युट्यूबवर मोठ्या प्रमाणावर सर्च केलं जातं. मात्र, चित्रपटातील गाणी आणि आर.माधवन याचा अभिनय प्रेक्षकांना जरी भावला असला तरी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कामगिरी करु शकला नाही. याविषयी आर. माधवनने एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. तसंच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजला का नाही या मागचं कारणही त्याने सांगितलं आहे.
“ज्यावेळी हा चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी अपयशी चित्रपट म्हणूनच याकडे पाहिलं गेलं. प्रेक्षकांनी या चित्रपटाला डिसास्टर म्हटलं. मात्र, जसजसं या चित्रपटाला चित्रपटगृह मिळणं बंद झाला हा चित्रपट हळूहळू आयकॉनिक म्हणून ओळखला जाऊ लागला. आजही या चित्रपटाच्या गाण्यांवर प्रेक्षक ठेका घेतांना किंवा ती गाणी गुणगुणताना दिसून येतात”, असं आर. माधवन म्हणाला.
दरम्यान, ‘रहना हैं तेरे दिल में’ या चित्रपटात अभिनेत्री दिया मिर्झा, सैफ अली खान आणि आर. माधवन मुख्य भूमिकेत झळकले आहेत. या चित्रपटात माधवनने मॅडी ही भूमिका साकारली होती. तर, दियाने रिना मल्होत्रा ही भूमिका वठविली होती. या चित्रपटानंतर आर. माधवन हे नाव अनेक तरुणींच्या गळ्यातलं ताईत झालं आहे. माधवन लवकरच ‘निशब्दम या चित्रपटात झळकणार आहे.