लॉकडाउनमुळे सर्व मालिकांचं चित्रीकरण पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे मालिकांचे जुने भाग, जुन्या काही मालिकांचं पुनःप्रक्षेपण आणि पूर्वीचे पुरस्कार सोहळे यांचं प्रक्षेपण सध्या वाहिन्यांवर होत आहे. आता झी मराठी वाहिनीवर मर्यादित भागांच्या नवीन मालिका व रिअॅलिटी शोज येत आहेत.

रामदास पाध्ये म्हटलं कि आपल्याला आठवतात ते बोलके बाहुले. ‘अर्धवटराव आवडा अक्का’ आणि त्यांच्या गमती जमती. आता हेच ‘अर्धवट रावआणि आवडा अक्का’ त्यांचा मुलगा ‘चंदन सून सुनयना आणि नातू छोटूसिंग’ सोबत घेऊन येत आहेत एक नवा कोरा कार्यक्रम ‘घरात बसले सारे’. या कार्यक्रमाबद्दल बोलताना रामदास पाध्ये म्हणाले, “मी देश विदेशात या बाहुल्यांचे अनेक प्रयोग केले. पण मालिकांमध्ये कधीच प्रयोग केला नव्हता. या मालिकेत मी माझ्या बोलक्या मित्रांसोबतच म्हणजेच बाहुल्यांसोबत एक वेगळा प्रयोग करणार आहे. हा कार्यक्रम साकारताना अपर्धा पाध्ये, सत्यजित आणि ऋतुजा पाध्ये यांची खूप मदत झाली. सत्यजितने या बाहुल्यांना आवाज तर दिलाच पण त्याच सोबत या कार्यक्रमाच्या दिग्दर्शनाची धुरादेखील सांभाळली आहे. तसंच ऋतुजा पाध्ये यांनी या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाची जबाबदारी घेतली आहे. या मालिकेत चंदन आणि सुनयना यांच्यातील तू तू मै मै आणि त्यांच्या जीवनात घडणाऱ्या मजेशीर गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळतील.”

छोटू सिंगचं रॅप साँग आणि त्याच्या गमती जमती या मालिकेचं खास आकर्षण असणार आहेत. घरात बसले सारे हा बोलक्या बाहुल्यांचा धमाल कार्यक्रम ८ जून पासून संध्याकाळी ७ वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.