दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अभिनेत्री पायल घोष हिने लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले आहेत. तिच्या या खळबळजनक आरोपांमुळे अनुरागवर सध्या जोरदार टीका होत आहे. दरम्यान या प्रकरणात आता अभिनेत्री रिचा चड्ढा हिने देखील उडी घेतली आहे. तिने पायल घोष विरोधात राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली. शिवाय तिने पायलला एक नोटीस देखील पाठवली होती. परंतु तिने त्या नोटीसचा स्विकार केला नाही. परिणामी संतापलेल्या रिचाने आता थेट कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

पायलने अनुरागवर आरोप करताना काही बॉलिवूड अभिनेत्रींची नावं घेतली होती. यापैकी एक नाव रिचा चड्ढा हिचं देखील होतं. अनुराग प्रकरणात तिचं नाव घेतल्यामुळे रिचा संतापली आहे. विनाकारण माझं नावं या प्रकरणात ओढलं जात आहे, असं म्हणत तिने पायल विरोधात राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली. परंतु पायलने या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं. परिणामी रिचाने आता पायल विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

पायल घोषचा आरोप काय?

“अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केलं असून मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली आहे. कृपया या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा, ज्यामुळे या माणसाचं खरं रुप समोर येईल. मला माहित आहे यामुळे मला धोका असून माझ्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कृपया माझी मदत करा”, असं ट्विट पायलने केलं.

अनुरागने फेटाळले आरोप

“क्या बात है. मला गप्प करण्यासाठी बराच वेळ घेतलास. काही हरकत नाही. पण मला गप्प करता करता इतकं खोटं बोललीस की स्वत: सोबत अन्य महिलांनादेखील या वादात घेतलंस. थोडी तरी मर्यादा बाळगा मॅडम, बास्स इतकंच बोलू शकतो मी. जे काही आरोप केले आहेत ते सगळे अर्थहीन आहेत”, असं ट्विट अनुराग कश्यपने केलं आहे.