अॅक्शन, रोमान्स, कॉमेडी, ड्रामा या सर्व गोष्टी एकाच चित्रपटात म्हटलं की दिग्दर्शक रोहित शेट्टी आठवल्याशिवाय राहत नाही. ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘सिंघम’, ‘गोलमाल’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफीस गाजवलं. त्यानंतर आता पुन्हा एकदा रोहित शेट्टीचा बहुचर्चित चित्रपट ‘सिम्बा’ प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे रणवीर सिंग आणि सारा अली खान यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात तब्बल अकरा मराठी कलाकारांची फौज आहे.

सौरभ गोखले, अश्विनी काळसेकर, विजय पाटकर, नेहा महाजन, अशोक समर्थ, वैदेही परशुरामी, अरुण नलावडे, सुलभा आर्या, नंदु माधव, सुचित्रा बांदेकर आणि सिद्धार्थ जाधव हे अकरा मराठी कलाकार या चित्रपटात भूमिका साकारत आहेत. याबद्दल सिद्धार्थ म्हणतो, ‘मराठी सिनेसृष्टीतले उत्तमोत्तम कलाकार या चित्रपटात आहेत. त्यामुळे मी बऱ्याचदा मस्करीत म्हणतो, रोहित सरांनी एक मराठी चित्रपट बनवलाय, ज्यामध्ये रणवीर आणि सारा आहेत.’

‘रोहित सरांना मराठी कलाकारांविषयी विशेष प्रेम आहे. मराठी कलाकारांमध्ये जो आपलेपणा आणि जो प्रोफेशनल एटिट्युड असतो, तो सरांना खूप आवडतो,’ असं वैदेही म्हणाली. रोहित शेट्टीच्या चित्रपटांमध्ये सर्वाधिक दिसलेली मराठी अभिनेत्री म्हणजे अश्विनी काळसेकर. ‘सिम्बा’मुळे ती सहाव्यांदा रोहितसोबत काम करतेय. तर रोहित शेट्टीच्या चित्रपटात पाचव्यांदा काम करणारे विजय पाटकर म्हणतात, ‘अभिनेत्यांकडून चांगला अभिनय करून घ्यायचा असेल, तर त्यांना तेवढा आराम देणंही गरजेचं असतं, हे रोहित शेट्टी यांना चांगले माहित आहे. मराठी नटांसोबत काम करताना मजा येते, असं रोहित शेट्टी नेहमी म्हणतात.’

धर्मा प्रॉडक्शन निर्मित आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी २८ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.