मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या चतुरस्र अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारे दोन गुणी अभिनेते म्हणजे डॉ. गिरीश ओक आणि संजय मोने. मनोरंजनाच्या या विश्वात या दोघांनी विविध भूमिकांमधून अभिनयाची मनसोक्त मुशाफिरी केली आहे. धीरगंभीर चरित्र भूमिका, विनोदी, खलनायक अशा एक ना अनेक भूमिका या दोघांनी आजवर साकारल्या आहेत. या दोघांनी एकत्र काम केलेलं कुसुम मनोहर लेले (कुमले) हे नाटक तर रंगभूमीवर मैलाचा दगड ठरलं. या नाटकानंतर या दोन अभिनेत्यांनी एकत्र काम करण्याचा योग तसा जुळून आला नाही. आता अनेक वर्षांनंतर ही जोडगोळी एकत्र दिसणार आहे झी मराठीवरील ‘पसंत आहे मुलगी’ या मालिकेत. कुमलेप्रमाणे यातही गिरीश ओक पंतांच्या सकारात्मक भूमिकेत आहेत तर संजय मोने हे खलनायकाची भूमिका साकारत आहेत. या दोघांच्या अभिनयाची जुगलबंदी या मालिकेतून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
देवसाखरी गावातील आनंद महाराजांच्या मठाचं मानाचं पद पंतांकडे आहे. परंपरेशी तडजोड नाही हा पंतांचा स्वभावधर्म. त्यांच्या शब्दाला गावात मोठा मान आहे त्यामुळे आनंद महाराजांच्या मठाचा आणि देवसाखरीचा संपूर्ण कारभार हा त्यांच्या शब्दावर चालतो. कृष्णकांत कुलकर्णी हे या गावातील राजकीय महत्वाकांक्षा असणारं व्यक्तिमत्व. पंतांना मिळणारा हा मान मराताब कृष्णकांत कुलकर्णीच्या डोळ्यांत खुपतोय म्हणूनच पंताची ही प्रतिष्ठा स्वतःकडे यावी यासाठी तो सतत काही तरी खेळ्या रचतोय पण त्यात मात्र कधीच यशस्वी ठरत नाहीये. पंतांची ही सत्ता स्वतःकडे घेण्यासाठी आता कुलकर्णीच्या डोक्यात पंतांच्या घरात फूट पाडण्याचा कुटील डाव आकार घेतोय. यासाठी तो स्वतःच्याच मुलीला मोहरा बनवून खेळी खेळणार आहे. आपली मुलगी नीता हिचा विवाह पंतांचा धाकटा मुलगा पुनर्वसूशी (वासू) करून देण्याचा त्याचा मानस आहे. नीता या घरात नांदायला गेली की तिच्याआधारे या घरात फूट पाडून ती सत्ता बळकावयाची असा छुपा मनसुबा कुलकर्णीच्या डोक्यात आहे. तिकडे पुनर्वसू मात्र उर्मीच्या प्रेमात आहे. त्याला तिच्याशीच लग्न करायचंय. इकडे कुलकर्णी साळसूदपणाचा आव आणत पंतांकडे नीताच्या लग्नाची गोष्ट बोलून दाखवतो आणि पंतही नीताला आपली सून बनवून घेण्यास तयार होतात. पंत आपला निर्णय वासूला ऐकवतात. पंतांचा शब्द नाकारण्याची हिंमत वासूमध्ये नाहीये त्यामुळे तोही या लग्नासाठी तयार होतो. या दोघांचा विवाह लावून देण्यात आणि आपले मनसुबे खरे करण्यात कुलकर्णी यशस्वी होतो का ? आणि हा विवाह झाला नाही तर त्याची पुढची खेळी काय असेल ? हे प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारं असेल.
संग्रहित लेख, दिनांक 19th Feb 2016 रोजी प्रकाशित
संजय मोने आणि गिरीश ओक यांच्या अभिनयाची जुगलबंदी
परंपरेशी तडजोड नाही हा पंतांचा स्वभावधर्म.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 19-02-2016 at 13:42 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay mone and girish oak character in pasant ahe mulgi