देशभरात सध्या #MeToo मोहिमेची जोरदार चर्चा आहे. बॉलिवूडपासून सुरू झालेल्या या मोहिमेत क्रीडा, राजकारण अशा विविध क्षेत्रातील दिग्गजांची नावं समोर आली. देशभरात घोंघावत असलेल्या या #MeToo च्या वादळाबाबत अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. काहींनी या मोहिमेला पाठिंबा दर्शविला तर काहींनी हा पब्लिसिटी स्टंट असल्याचं म्हटलं. या मोहिमेवर आता बॉलिवूडमध्ये ‘बॅड बॉय’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेते शक्ती कपूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शक्ती कपूर यांनी या मोहिमेवरच काही प्रश्न उपस्थित केले आहेत. इतकंच नव्हे तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता हस्तक्षेप करावा असं आवाहन त्यांनी केलं आहे.

‘#MeTooची बरीच प्रकरणं समोर येत आहेत. अशा प्रकरणांमध्ये ७० टक्क्यांहून अधिक मुली ब्लॅकमेल करत आहेत. त्यामुळे संबंधित व्यक्तीचं नाव जाहीर न करता कोर्टात जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याची बदनामी रोखावी. कलाकार असो, व्यावसायिक असो किंवा नेता असो, कोर्टात आरोप सिद्ध झाल्यावरच त्यांची नावं जाहीर करावी,’ असं शक्ती कपूर या ऑडिओ क्लिपमध्ये म्हणत आहेत.

एखाद्यावर आरोप केल्यानंतर त्याच्यावर काय परिस्थिती ओढवते हे ते या क्लिपमध्ये सांगत आहेत. ‘आरोपांमुळे अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. त्यांचं पूर्ण करिअर संपतं. कुटुंबीयसुद्धा त्यांच्याकडे संशयाने पाहू लागतात. नोकरीवरून त्यांना हाकललं जातं. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालून याबाबत कायदा करावा. साजिद खान, हृतिक रोशन, अमिताभ बच्चन यांच्यावर आरोप केले जात आहेत. साजिदला चित्रपटाच्या दिग्दर्शक पदावरून हटवण्यात आलं. उद्या मोदी साहेब तुमच्यावरही आरोप होतील, तेव्हा तुम्ही काय करणार?,’ असा प्रश्न शक्ती कपूर यांनी विचारला आहे.

शक्ती कपूर यांना एका कार्यक्रमात तनुश्री दत्ता- नाना पाटेकर वादावर प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी आपल्याला हे प्रकरण माहित नसल्याचं म्हटलं होतं. ‘१० वर्षांपूर्वी काय घडलं मला काही माहित नाही. तेव्हा तर मी खूपच लहान होतो,’ असं ते म्हणाले होते.