भारत-पाकिस्तानदरम्यान तणाव सुरू असताना पाकिस्तानमध्ये जाऊन परफॉर्म करणं गायक मिका सिंगला महागात पडलं. ‘ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन’ (AICWA) आणि ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने इम्प्लॉई’ने (FWICE) मिकावर बंदी घातली असताना अभिनेत्री शिल्पा शिंदेने मिकाला पाठिंबा दर्शविला आहे. इतकंच नव्हे तर मी पाकिस्तानमध्ये परफॉर्म करणार, हिंमत असेल तर रोखून दाखवा, असं खुलं आव्हानच तिने दिलं आहे.

याप्रकरणी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत शिल्पा म्हणाली, ”पाकिस्तानमध्ये उत्तम गायक असतानाही मिकाला तिथे परफॉर्म करायला बोलावलं याचं तुम्ही कौतुक करायला पाहिजे. जर सरकारचं मिकाला व्हिसा देत असेल तर इतर कोणी कसं काय थांबवू शकतं? मी फेडरेशनला सांगू इच्छिते की इंडस्ट्रीमध्ये इतरही बऱ्याच समस्या आहेत ज्यावर ते लक्ष केंद्रीत करू शकतात. कलाकार आणि क्रू मेंबर्सच्या कामाच्या तासांबाबत अजून ते नियम आखू शकले नाहीत. अजूनही कलाकार १२-१५ तास काम करतात. आपल्याच कलाकारांवर टीका करणे ही शरमेची बाब आहे.”

माझी देशभक्ती दाखवण्यासाठी मला ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ बोलावं लागेल का, असा सवालही तिने केला. ती इथेच थांबली नाही तर, फेडरेशनने तिच्यावरही बंदी घातल्यास रस्त्यावर परफॉर्म करण्याचा इशाराही तिने दिला.

कोण आहे शिल्पा शिंदे?

‘भाभीजी घर पर हैं’ या मालिकेत तिने साकारलेली भाभीजी ही भूमिका खूप प्रसिद्ध झाली. पण नंतर अचानक तिने ही मालिका सोडली. निर्मात्यांवर मानधन न दिल्याचं आरोप करत तिने मालिका सोडली होती. त्यानंतर ‘बिग बॉस’ या बहुचर्चित रिअॅलिटी शोमध्ये तिने भाग घेतला. या शोच्या अकराव्या पर्वाची ती विजेती ठरली.