सर्वांची लाडकी अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अखेर लग्नबंधनात अडकली आहे. ७ मे ला सोनालीने कुणाल बेनोडेकरशी लग्नगाठ बांधली. दुबईमध्ये अगदी साध्या पद्धतीने सोनालीने विवाह सोहळा उरकला आहे. सोनालीच्या या लग्न सोहळ्याला तिचे आणि कुणाले आई-वडिलदेखील उपस्थित नव्हते. खरं तर प्रत्येक मुलीप्रमाणे सोनानीला देखील मोठ्या थाटामाटात लग्न करण्याची इच्छा होती. मात्र देशातील सध्याची परिस्थिती पाहता सोनालीने धाडसी निर्णय घेतला. सध्याच्या परिस्थितीत  समारंभापेक्षा लग्न महत्वाचं असल्याचं म्हणत सोनालीने हा निर्णय घेतला. सोनालीच्या या निर्णयाचं अनेकांनी कौतुक केलंय.

१८ मेला सोनालीने तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत सगळ्यांना आनंदाची बातमी दिली. सोनालीच्या या बातमीने मराठी सिनेसृष्टीतील तिच्या सर्व मित्र मैत्रिणींसह चाहत्यांना देखील आनंदाचा मोठा धक्का बसला. सोशल मीडियावरून सोनालीवर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होतोय. तसचं सोनालीच्या निर्णयाचं कौतुकही होतंय. खरं तर सोनालीने युकेमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. करोनामुळे जून महिन्यातील लग्न जुलैमध्ये मात्र लंडनमध्येच करण्याचं ठरलं असतानाही सोनालीने मे महिन्यातच दुबईत लग्न सोहळा उरकला. यामागचं कारण सोनालीने सांगितलं आहे. फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये तिने तिच्या या निर्णयामागचं कारणं स्षष्ट केलंय.

सोनालीने तिच्या कॅप्शनमध्ये तिचा या लग्नापर्यंतचा प्रवास सांगितला आहे. ती म्हणाली, “मार्चमध्ये शूटिंग संपवून दुबईला आले आणि भारतात दुसरी लाट आली. त्यामुळे मी पुन्हा अडकले..लग्नबंधनात नाही..दुबईमध्ये.दरम्यान येकेने भारतीयांसाठी प्रवास बंदी घातली. मग जुलैपर्यंत परिस्थिती बदलणार नाही म्हणून..क्वारंटाईन, प्रवासाच्या अडचणी, कुटुंबासाठी असणारा धोका, एकंदरीत होणारा अनावश्यक खर्च, सरकारचे नियम, या सगळ्यांचा विचार करून आम्ही आमचा भला मोठा लग्न समारंभ रद्द करायचा निर्णय घेतला.” असं म्हणत सोनालीने थाटामाटातलं लग्न रद्द करण्यामागचं कारणं सांगितलं आहे.

देशात बिकट परिस्थिती असताना आम्ही कुठलंही सेलिब्रेशन करूच शकत नाही

तर पुढे ती म्हणाली, “जूनचं जुलै करून पुढे ढकल्याऐवजी जुलैचं मेमध्ये लग्न करून सगळ्यांना सुखद धक्का देऊ म्हंटलं. आम्ही आता एकत्र एका देशात आहोत, पुढे कधी काय होईल माहीत नाही. जगभरातली परिस्थिती पाहता आता एकमेकांची तब्येत जपून ‘लग्न’ जास्त महत्वाचं आहे ना की ‘समारंभ’. आपल्या देशात इतकी बिकट परिस्थिती असताना आम्ही कुठलंही सेलिब्रेशन करूच शकत नाही, तो खर्च वाचवून कोणाला मदत करता यावी या सारखं भाग्य नाही.” असं ती म्हणालीय. सोनालीच्या निर्णायाने सर्वांनाच आनंद झालाय.

दोघांचेही कुटुंबीय या लग्नाला उपस्थित नव्हते. केवळ दोन दिवसात लग्नाची तयारी केली. एका तासात खरेदी आणि १५ मिनिटांमध्ये लग्न उरकलं. या लग्नाला केवळ ४ निकटवर्तीय उपस्थित होते. असं सोनालीने सांगितलं आहे. सोनीलीच्या या पोस्टवर तिला शुभेच्छा देत अनेकांनी तिच्या या निर्णयाचं कौतुक केलं आहे.

अभिनेता स्वप्निल जोशीने, “कमाल केवळ कमाल” असं म्हणत सोनाली आणि कुणालला शुभेच्छा दिल्या आहेत. तर अभिनेत्री दिप्ती देवीने, “किती सुंदर आणि उत्तम निर्णय” म्हणत सोनालीच्या निर्णयाचं कौतुक केलंय.