अनेक वेळा रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांचा उपद्रव होत असतो. त्यामुळे त्यांना नियंत्रणामध्ये आणण्यासाठी अनेक उपाय करण्यात येतात. मात्र काही वेळा त्यांना नियंत्रणामध्ये आणण्यासाठी नागरिक टोकाचा निर्णय घेतात. कधी कधी या मुक्या जीवांचा जीवही जातो. याचा प्रत्यय नुकताचं मुंबईतील वरळी येथे आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळत आहे. वरळीमधील एका इमारतीमध्ये भटक्या कुत्र्याला अमानुषपणे वागणूक मिळाली असून सध्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. अभिनेत्री सोनम कपूर आणि अनुष्का शर्मा यांनीदेखील या घटनेचा संताप व्यक्त करत मुक्या जनावरांना न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठविला आहे.

गेल्या काही दिवसापासून मुंबईमध्ये प्रचंड पाऊस पडत आहे. त्यामुळे पावसापासून प्रत्येक जण या पावसापासून संरक्षण करण्यासाठी आसरा शोधत आहे. त्याप्रमाणे मुंबईमधील वरळी येथील एक कुत्रादेखील पावसापासून वाचण्यासाठी आसऱ्याचा शोध घेत होतो. यावेळी त्याने येथील एका इमारतीचा आधार घेण्याचा प्रयत्न केला. मात्र या इमारतीच्या वॉचमनने या कुत्र्याला अमानुषपणे मारहाण करत इमारतीच्या बाहेर हकलले. या घटनेनंतर हा कुत्रा मरणावस्थेमध्ये आढळून आला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यातच अभिनेत्री सोनम कपूर,अनुष्का शर्मा आणि जॅकलीन फर्नांडिस यांनी या कुत्र्याचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत घटनेचा निषेध नोंदविला आहे. त्यासोबतच मुक्या जनावरांना न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठविला आहे.

‘अशा प्रकारची वागणूक ही अमानुषतेचा कळस आहे. ही वेळ समाजातील प्रत्येक नागरिकाने एकत्र येण्याची आणि जे स्वत:च्या न्यायासाठी आवाज उठवू शकत नाहीत, अशा मुक्या जनावरांना न्याय देण्याची आहे’, असं अनुष्का म्हणाली. तर ‘ज्या व्यक्तीने या मुक्या जनावराला अशी वागणूक दिली, त्याच्याविरोधात एफआयआर दाखल झाला आहे’, असं सोनमने सांगितलं.

दरम्यान, सोनम, अनुष्काप्रमाणेच जॅकलीन फर्नांडिसनेही इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन केलं आहे. जॅकलीनने सोनमच्या पोस्टवर कमेंट करत ‘हा गुन्हा आहे, याप्रकरणी अन्याय करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे’, असं ती म्हणाली आहे, सोबतच तिने ‘पेटा इंडिया’ला टॅग ही केलं आहे.