गेल्या कित्येक दिवसापासून अभिनेता सोनू सूद मजुरांच्या मदतीसाठी उभा ठाकला आहे. लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरु झाला आहे,तरीदेखील एकही दिवस सुट्टी न घेता सोनू सूद आणि त्याची टीम सतत मदतकार्य करत आहे. आतापर्यंत सोनूने हजारोंच्या मजुरांना त्यांच्या घरी सुखरुप पोहोचवलं आहे. त्यामुळे अनेकांसाठी हिरो झालेल्या सोनू सूदचे प्रत्येक जण आभार मानत आहे. यामध्येच बिहारच्या एका मुलाने लॉकडाउन संपल्यानंतर खास सायकलवरुन बिहार -मुंबई असा प्रवास करुन भेटायला येईल असं सांगितलं आहे.
सोनू सूद करत असलेलं मदतकार्य पाहून अनेक जण भारावले आहेत. त्यातच मुजफ्फरपूरमधील धीरज कुमार याने ट्विट करत सोनूला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे त्याने मुजफ्फरपूर ते मुंबई असा प्रवास थेट सायकलवरुन करणार असल्याचं म्हटलं आहे. धीरज कुमारचं हे ट्विट पाहिल्यानंतर सोनूने त्याला लगेच रिप्लाय दिला आहे.
साइकल चलाने का और पैदल चलने का समय गया मेरे दोस्त। अब मैं आपके पास आऊँगा और तुम मुझे साइकल पर बीठाकर पूरा मुज़फ़्फ़रपुर घूमना। https://t.co/53ur0C9MiF
— sonu sood (@SonuSood) May 28, 2020
“आता सायकल आणि पायी प्रवास करण्याचे दिवस गेले मित्रा. आता मीच तिकडे येईन आणि तू मला तुझ्या सायकलवर बसवून पूर्ण मुजफ्फरपूर फिरव”, असा रिप्लाय सोनूने धीरजा दिला. दरम्यान, सोनूचं हे उत्तर वाचून अनेकांनी त्यांचं कौतूक केलं आहे. एक सेलिब्रिटी असूनही तो सामान्य नागरिकांमध्ये त्यांच्यातलाच एक होऊन राहतो असं अनेकांनी म्हटलं आहे.