गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही ऐतिहासिक मालिका अखेर आज संपणार आहे. या मालिकेचा शेवटचा एपिसोड आज (शनिवारी) प्रसारित होणार आहे. मालिकेच्या टीमसोबतच प्रेक्षकांसाठीही हा भावूक क्षण आहे. या मालिकेतील काही कलाकारांनी फेसबुकवर पोस्ट लिहित सेटवरचे फोटो पोस्ट केले आहेत.
अभिनेता साईराज सोतेकरने फेसबुकवर लिहिलं, ‘जगदंब क्रिएशनमुळे या मालिकेत माझं मालिका क्षेत्रातील पहिलं पाऊल पडलं. माननीय डॉ. अमोल कोल्हे सरांसोबत काम करताना खरंच अंगावर शहारा यायचा. असं एकपाठी अभिनेता नाही पाहिला. मी माझं भाग्य समजतो की मला संभाजी महाराजांचा मावळा कावजी ही भूमिका साकारता आली. पण खंत वाटते की त्यांची अखेरपर्यंत साथ देऊ शकलो नाही’, असं लिहित त्याने टीमसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत.
या मालिकेतून संभाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडींवर, तसेच बारीकसारीक प्रसंगांवर प्रकाश टाकण्यात आला. डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेली संभाजी यांची भूमिका, तसेच शंतनू मोघे यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आणि प्राजक्ता गायकवाडने साकारलेली येसुबाईंची भूमिका यांनादेखील प्रेक्षकांचे तितकेच प्रेम मिळाले.
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका संपल्यानंतर त्याच वेळात ‘माझा होशील ना’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 29, 2020 5:35 pm