अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) मंगळवारी अटक केली. जामीन अर्ज फेटाळून न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली. अमली पदार्थ विकत घेणे, त्यासाठी अन्य आरोपींशी संगनमत करणे, याबाबत रियाविरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा ‘एनसीबी’ने केला. रियाच्या अटकेनंतर बॉलिवूडमधली अनेक कलाकारांनी तिला पाठिंबा दर्शविला. आपल्या परखड व बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री तापसी पन्नू हिने ट्विट करत रियाच्या अटकेवर संताप व्यक्त केला. ‘जर सुशांत जिवंत असता तर त्यालासुद्धा अटक केली असती का’, असा सवाल तापसीने केला.

एका वृत्तवाहिनीचं ट्विट शेअर करत तापसी म्हणाली, ‘रिया ड्रग्सचं सेवन करत नव्हती. ती सुशांतसाठी ड्रग्सची खरेदी करून देत होती. त्यामुळे याप्रकरणात जर सुशांत जिवंत असता तर त्याला सुद्धा कारागृहात डांबलं असतं का? अरे नाही. तिने तर सुशांतला ड्रग्स घेण्यासाठी बळजबरी केली असेल. होय, असंच असेल. आपण करून दाखवलं.’ तापसीसोबतच अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी रियाच्या अटकेवर निषेध व्यक्त केला आहे.

याआधी रियाचा भाऊ शोविक, सुशांतचा व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा, नोकर दीपेश सावंत, अमली पदार्थ विक्रेता झैद विलात्रा, कैझान इब्राहिम, अब्देल बसीत परिहारसह नऊ जणांना एनसीबीने अटक केली आहे. त्यापैकी शोविक, सॅम्युअल, दीपेश यांच्यासमोर रियाची चौकशी करण्यात आली. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचे धागेदोरे अमली पदार्थांशी जोडलेले आहेत का, याबाबतही एनसीबीकडून तपास सुरू आहे.