नाना पाटेकर म्हणजे दुसरा आसाराम बापू अशा शब्दांत अभिनेत्री तनुश्री दत्ताने टीका केली आहे. #MeToo मोहिमेअंतर्गत नाना पाटेकरांवर तनुश्रीने लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. याप्रकरणी काही गोष्टींचा खुलासा करण्यासाठी तिने तिच्या वकिलासोबत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत तिने नानांवर बरेच आरोप केले. नाना पाटेकर यांचे वकील निलेश पावसकर यांनी दबाव टाकल्याचाही आरोप तनुश्रीने केला.

“नाना पाटेकर यांचे वकील निलेश पावसकर यांनी सर्व पुरावे नष्ट केले आहेत. त्यांनी २००५ सालापासून नाना पाटेकर यांच्यावरील अनेक लैंगिक शोषणाची प्रकरणे रद्द केल्या आहेत. नाना पाटेकर यांनी त्यावेळी मनसेच्या गुंडांना बोलावून सेटवर गोंधळ घातला होता. त्यानंतर कोरिओग्राफर गणेश आचार्यने माझं करिअर उध्वस्त केलं,” असे आरोप तनुश्रीने केले.

‘नाम’ फाऊंडेशनच्या माध्यमातून भ्रष्टाचार केल्याचा आरोप

या पत्रकार परिषदेत तनुश्रीने नाना पाटेकर यांच्या नाम फाऊंडेशनवरही गंभीर आरोप केले. “नाना पाटेकर यांनी नाम फाऊंडेशनच्या नावावर कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला. त्यांनी या संस्थेच्या नावाचा वापर करून परदेशातून कोट्यवधींच्या देणग्या घेतल्या. हा पैसा कुठे जातो? गरीबांना वर्षातून एकदा साड्या वाटायच्या आणि फोटो काढायचा की यांचं काम झालं. ते कोल्हापूर पूरग्रस्तांना ५०० घरं देणार होते, त्याचं काय झालं? हे कोणी जाऊन बघितलं?”, असे प्रश्न तिने उपस्थित केले.