निर्बंध शिथिल होताच परराज्यातून बांधाबांध सुरू

मुंबई : कठोर निर्बंधांमुळे चित्रीकरणासाठी राज्याबाहेर गेलेले दूरचित्रवाणी मालिकांचे चमू परतू लागले आहेत. राज्य सरकारने चित्रीकरणाला परवानगी दिल्यानंतर काही निर्मात्यांनी स्थलांतरासाठी बांधाबांध सुरू केली आहे. मुंबईतही चित्रीकरणाच्या पूर्वतयारीला वेग आला आहे. काही निर्माते मात्र जोखीम घेण्यास तयार नसल्याने निर्बंध आणखी शिथिल होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

करोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवल्यानंतर राज्य सरकारने एप्रिलमध्ये कठोर निर्बंध लागू केले. चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरणही थांबवण्यात आले. पहिल्या टाळेबंदीत मनोरंजन क्षेत्राला मोठा फटका बसल्याने यावेळी निर्माते आणि वाहिन्यांनी इतर राज्यात जाऊन चित्रीकरण सुरू केले. परंतु राज्याबाहेर चित्रीकरण करणे अधिक खर्चिक आणि आव्हानात्मक असल्याने राज्यात पुन्हा चित्रीकरण सुरू करण्याची मागणी वारंवार होत होती. त्यानुसार ७ जूनपासूनच राज्य सरकारने चित्रीकरणाला परवानगी दिली आहे.

चित्रीकरण तयारी जोरात.. सध्या मुंबईतील बऱ्याच चित्रीकरणस्थळांवर पूर्वतयारीला वेग आला आहे. चित्रीकरणस्थळी पावसाळ्याच्या दृष्टीने खबरदारी, स्वच्छता, डागडुजी सुरू झाली आहे. परराज्यात जाताना निर्मात्यांनी निवडक चमू बरोबर नेला होता. त्यामुळे मुंबईत असलेला उर्वरित कर्मचारीवर्ग चित्रीकरणाच्या तयारीत व्यग्र आहे.

केवळ मालिकेच्या भागांचीच नव्हे तर मालिकेच्या चमूतील प्रत्येकाची जबाबदारी निर्मात्यावर असल्याने हे स्थलांतर निर्मात्यांसाठी कसरतीचे आहे. – विद्याधर पाठारे, निर्माते काही महिने आम्ही कुटुंबापासून दूर होतो. आम्हीच एकमेकांचे कुटुंब झालो होतो. आता पुन्हा ती घडी विस्कटणार असल्याने आम्ही गहिवरलो आहोत. मुंबईत आल्यावरही थेट चित्रिकरण करणार असल्याने घरच्यांपासून दूर राहण्याचेही शल्यही टोचत राहील. – मनवा नाईक, अभिनेत्री-निर्माती