आज आमिर ५६ वर्षांचा झाला पण त्याची सध्याची त्याची बॉक्स ऑफिसवरची कामगिरी पाहता तो फार पुढे आहे. ‘गजनी’ चित्रपटाच्या माध्यमातून त्यानं १०० कोटींच्या घरात प्रवेश केला आणि तिथे टिकून राहिला. परिस्थिती तर अशी आहे की, जर आज आमिरच्या चित्रपटाने ३०० कोटी कमवले नाहीत तर त्या चित्रपटाला फ्लॉप म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. एवढंच काय, ‘चीनची भिंत’ सर करणारा तो पहिलाच बॉलीवूडकर. ‘थ्री इडियट्स’, ‘दंगल’ या त्याच्या चित्रपटांनी ‘चिनी ड्रॅगन’लाही भुरळ पाडली.  त्याच्या चित्रपटांनी चीनची थिएटर्स आणि मार्केट दोन्ही काबिज केलं.

आमिर खान बॉलीवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो. कशामुळं आहे त्याचं हे परफेक्शन? कोणत्या गोष्टी त्याला परफेक्ट बनवतात. चला आज त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया.

१. मार्केटिंगची तंत्रं

एखाद्या मार्केटिंगमधल्या तज्ज्ञालाही आमिर त्यात मागे टाकेल. आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्याने हातात फक्त रेडिओ घेत न्यूड फोटोशूट केलं. तर कधी कधी ‘गजनी’ होत प्रेक्षकांनाही गजनी व्हायला भाग पाडलं. प्रत्येक वेळी प्रमोशन, मार्केटिंगची तऱ्हाच वेगळी!

२. रुप बदलण्याची कला

होय, बरोबर वाचलंत. ही अतिशयोक्ती नाही. आमिरकडे खरोखर रुप बदलण्याची कला आहे. आता हेच पाहा ना, ‘दंगल’ चित्रपटात फार फार तर १५ते २० मिनिटांचा सीन असेल, पण त्यासाठी त्यानं फिट ते फॅट असा प्रवास केला. सुरुवातीला फिट आणि नंतर फॅट. ‘सिक्रेट सुपरस्टार’ असेल ‘ठग्ज ऑफ हिंदुस्तान’ असेल, ‘तलाश’ असेल…कोणत्याही चित्रपटात सारख्या भूमिका नाहीत. वेगळी भूमिका, वेगळा अवतार. कधी नाक, कान टोचले, कधी दाढी-केस वाढवले तर कधी वजन कमी जास्त केलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aamir Khan (@_aamirkhan)

३. एक वर्ष, एक चित्रपट

एकाच वेळी चार चार चित्रपटात काम करणारे अनेकजण असतात. पण आमिरने मात्र स्वतःला नियम घालून घेतला आहे. एका वर्षी फक्त एकच चित्रपट स्वीकारणार आणि जी जान से त्याच एका चित्रपटावर काम करणार. आणि परिणाम तर आपल्याला दिसतोच आहे.

४. अभिनेता कम सामाजिक कार्यकर्ता

महाराष्ट्रातला पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी हातात कुदळ फावडं घेऊन संपूर्ण राज्याला दुष्काळमुक्तीच्या प्रयत्नात वळवणं असो किंवा नर्मदा बचाव आंदोलनात सहभागी होणं असो. आमिर सामाजिक कार्यातही पुढे राहिला आहे. सत्यमेव जयते या त्याच्या कार्यक्रमाने अनेक गंभीर विषयांना वाचा फोडली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aamir Khan (@_aamirkhan)

५. आईला…..ओ तेरी….विनोदातही अव्वल..

फक्त गंभीर भूमिकाच नव्हे, विनोदी भूमिकाही त्याने तेवढ्याच तोडीच्या निभावल्या. ‘अंदाज अपना अपना’ कोण विसरू शकतं? ‘दिल चाहता है’मध्ये त्याच्या भूमिकेने तरुणाईला अक्षरशः वेडं केलं होतं. ‘इश्क’, ‘रंगीला’मध्ये त्याची विनोदी बाजूही समोर आली.