विविध भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री विद्या बालन लवकरच ‘शकुंतला देवी’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. प्रत्येक भूमिकेला प्रभावीपणे रुपेरी पडद्यावर उतरवणारी विद्या नेहमीच तिच्या अभिनयाच्या माध्यमातून अनेकांना आश्चर्यचकित करत असते. त्यातच आता ती प्रसिद्ध गणितज्ञ शकुंतला देवींच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील पास नहीं तो फेल नहीं हे गाणं प्रदर्शित झालं होतं. त्यानंतर आता या चित्रपटातील दुसरंही गाणं प्रदर्शित झालं आहे.

‘शकुंतला देवी’ या चित्रपटातील ‘रानी हिंदुस्तानी’ हे दुसरं गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. विशेष म्हणजे या गाण्यातून शकुंतला देवी यांच्या स्वभावातील खेळकर वृत्तीचं दर्शन होतं. तसं विद्यानेदेखील तिच्या देहबोली, चेहऱ्यावरील हावभाव यांचा सुंदरित्या वापर केल्याचं पाहायला मिळत आहे. या गाण्यात शकुंतला देवींचा एकंदरीत स्वभाव दिसून येतो.

दरम्यान,सुनिधी चौहानच्या आवाज स्वरबद्ध झालेलं हे गाणं सचिन-जिगर या जोडीने कंपोज केलं आहे. तर प्रसिद्ध गीतकार वायू यांनी लिरिक्स दिल्या आहेत. या गाण्यात या चित्रपटात ‘दंगल गर्ल’ सान्या मल्होत्रा विद्याच्या मुलीची भूमिका साकरत आहे. त्यासोबतच जिशू सेनगुप्ता आणि अमित साध यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘शकुंतला देवी’ हा चित्रपट येत्या ३१ जुलै रोजी अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे.