टीव्ही जगतातील फिटनेस फ्रिक म्हणून जिचं नाव नेहमीच घेतले जाते अशा अभिनेत्री मंदिरा बेदीचा सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ४६ वर्षीय मंदिराचा हा व्हिडिओ एका फॅशन शोदरम्यानचा आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक लोक तिचं भरभरून कौतुक करताना दिसत आहेत.

त्याचे झाले असे की, मंदिराने रॅम्प वॉकवर पुशअप करतानाचा एक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरून शेअर केला. या फोटोला कॅप्शन देताना तिने लिहिले की, ‘खेळांवर मी प्रेम करते आणि फिटनेस हा माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वपूर्ण भाग आहे. अनेकदा फिटनेससाठी पाठिंब्याची गरज असते, पण मला तो पाठिंबा नेहमीच मिळत गेला. ट्रंफ फॅशन शो २०१८ मध्ये रॅम्प वॉक करणं माझ्यासाठी एक चांगला अनुभव होता. पण त्याहून जास्त चांगला अनुभव हा रॅम्पवर पुशअप करणं हा होता.’

मंदिराने आतापर्यंत अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. पण तिला खरी ओळख १९९४ मध्ये आलेली ‘शांति’ या मालिकेतून मिळाली. या मालिकेमुळे तिचं नाव आणि चेहरा घराघरात पोहोचला. मालिकांशिवाय तिने ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. १९९९ मध्ये तिने राज कौशलीशी लग्न केले. मंदिरा आणि राजला एक मुलगाही आहे. मंदिरा सोशल मीडियावर फार सक्रिय असते.