07 July 2020

News Flash

बदलणार केव्हा?

टीव्ही आणि दैनंदिन मालिका यांचा फार जुना संबंध आहे. संध्याकाळचे सात वाजले की, घराघरांतून दैनंदिन मालिकांची शीर्षकगीतं वाजायला सुरुवात होते.

| October 5, 2014 01:12 am

टीव्ही आणि दैनंदिन मालिका यांचा फार जुना संबंध आहे. संध्याकाळचे सात वाजले की, घराघरांतून दैनंदिन मालिकांची शीर्षकगीतं वाजायला सुरुवात होते. महिला मंडळाच्या कट्टय़ावर ‘आज अक्षराची सासू तिला काय बोलली?’, ‘जान्हवीची स्मृती परत कधी येणार?’, ‘शेखरच्या नोकरीचे आता काय होणार?’ या आणि अशाच चर्चा गाजत असतात. एकता कपूरने ‘क’च्या मालिकांची मुहूर्तमेढ रोवली आणि टीव्हीवर सास-बहूच्या दैनंदिन मालिकांची एक लांबलचक मालिका सुरू झाली. आज एक दशकाहून अधिक काळ या मालिका टीव्हीवर आणि पर्यायाने लोकांच्या मनावर राज्य करत आहेत. आंतरराष्ट्रीय टीव्हीवर विविध प्रयोग होत असताना आपल्याकडच्या वाहिन्या अजूनही या कौटुंबिक विषयांवरच्या मालिकांमध्ये अडकून पडल्या आहेत. हे चित्र बदलणार की नाही?, त्यासाठी वाहिन्यांकडून काही प्रयत्न केले जातात का?, अशा विविध गोष्टींचा हा लेखाजोखा.
नव्वदच्या दशकात टीव्हीचा उदय झाल्यावर ‘नुक्कड’, ‘हम लोग’, ‘देख भाई देख’, ‘हम पाँच’ अशा विविधरंगी आणि मुख्यत्वे कथा-कादंबऱ्यांवर आधारित मालिकांनी लोकांच्या मनाची पकड घेतली होती. ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘शक्तिमान’सारख्या मालिकांनी आबालवृद्धांना टीव्हीच्या प्रेमात पाडले होते. पण, हळूहळू हे चित्र पालटले. त्यांच्या जागी ‘क’च्या मालिकांची बाराखडी सुरू झाली. एक साधीभोळी सून, तिला तोडीसतोड आणि तिचा जीव नकोसा करून सोडणारी सासू, नणंद आणि जावांची फौज, रंगीत साडय़ा आणि टिकल्या लावलेल्या खलनायिका आणि कधीतरी आठवडय़ातून एकदा दिसणारा मालिकेचा नायक अशा स्वरूपाच्या मालिका टीव्ही व्यापू लागल्या. सुरुवातीला नवीन आलेल्या या मालिका प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाल्या होत्या. दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहिन्यांमुळे हळूहळू या मालिकांची संख्याही वाढू लागली. तुलसी, पार्वती, प्रेरणा ही घराघरात परवलीची नावे होऊ लागली. एखाद्या मालिकेत एखादे पात्र आजारी पडल्यास किंवा मरणाच्या दारात पोहोचले असल्यास कित्येकांच्या घरांमध्ये होमहवनाचे सोहळे होऊ लागले होते. पण, हा फॉम्र्युला येऊन आता दशकापेक्षा जास्त काळ लोटला आहे. आजही ‘ये रिश्ता क्या क हलाता है’, ‘साथिया’, ‘मधुबाला’, ‘मेरी आशिकी’ तर मराठीमध्ये ‘होणार सून मी या घरची’, ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’, ‘पुढचे पाऊल’ अशा अनेक मालिका याच मार्गाने चालल्या आहेत. पण, तरीही या मालिकांची मोहिनी अजूनही लोकांच्या मनावरून उतरलेली नाही, असे दिसते आहे.
बदलता प्रेक्षकवर्ग
निर्माती अश्विनी यार्दीच्या मते, नव्वदच्या दशकामध्ये टीव्ही खरेदी करणे ही चैनीची गोष्ट होती. शहरातील उच्चभ्रू समाजातील घरांमध्येच टीव्ही असत. त्यामुळे सुशिक्षित प्रेक्षकांना त्या काळच्या वैचारिक मालिका भावत असत. पण, आता गावागावांमध्ये टीव्ही पोहोचू लागला आहे. तेथील प्रेक्षकांना या मालिका जास्त भावतात. खेडय़ापाडय़ातील स्त्रिया टीव्हीवरील नायिकेच्या दु:खांमध्ये स्वत:ला अनुभवत असल्यामुळे तिला ती नायिका आपलीशी वाटू लागली होती. पण, याशिवाय प्रत्येक स्तरातील स्त्री या मालिकांशी वेगवेगळ्या कारणाने जोडली गेली होती. कोणाला सोशिक नायिका पाहून आपली सूनही तशीच हवी अशी इच्छा मनात येई, तर कोणाला गडगंज संपत्ती-आलिशान घरे यांचे कौतुक वाटू लागले. कित्येकजणी केवळ मालिकांमधील स्त्रीपात्रांनी घातलेले सुंदर कपडे आणि दागिने पाहण्यासाठी या मालिका नित्यनियमाने पाहू लागल्या होत्या. संध्याकाळी सातनंतरची वेळ म्हणजे घरातील गृहिणीची हक्काची वेळ. त्या वेळी पुरुषमंडळी घरी आलेली नसतात, मुले खेळण्यात किंवा अभ्यासामध्ये गुंतलेली असतात. अशा वेळी वेळ घालवायला या मालिका उत्तम करमणूक ठरू लागल्या आहेत, असे अश्विनी यार्दी यांना वाटते.
‘झी मराठी’चे बिझनेस हेड दीपक राजाध्यक्ष यांच्या म्हणण्यानुसार, टीव्हीवर अजूनही कौटुंबिक मालिकांचा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. या मालिकांमध्ये कुठेही तोचतोचपणा दिसणार नाही. काळानुसार प्रगल्भ होणाऱ्या नात्यांचे चित्रण आम्ही सतत करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण, असे असले तरी एका विशिष्ट काळानंतर या मालिकांमध्ये येणारा तोचतोचपणा नाकारता येणार नाही. ठरावीक काळासाठी एखादी मालिका प्रेक्षकांना पसंत पडली तर निर्माते आणि वाहिन्यांना मालिका चालू ठेवण्याचा मोह आवरता घेता येत नाही, पर्यायाने मूळ कथानक बाजूला राहून बाकीचा फाफटपसारा वाढू लागतो. मध्यंतरी संजय लीला भन्साळी यांची निर्मिती असलेली ‘सरस्वतीचंद्र’ ही मालिका काही काळापर्यंत प्रेक्षकांना पसंतीस पडली होती. पण, ज्या क्षणी मालिकेतील कादंबरीला आधारित कथानक संपून त्यात वेगळ्या कथेची भेसळ होऊ लागली तेव्हा मात्र प्रेक्षकांनी या मालिकेकडे पाठ फिरवली. हीच गत ‘तुम्हारी पाखी’ या मालिकेचीही झाली. कथानकाचा मूळ गाभा संपल्यावर मालिका आवरती घेण्याकडे कल देणाऱ्या वाहिन्यांची संख्या फारच कमी आहेत.
प्रयोगशील मालिकांसाठी..
टीव्हीवरील आघाडीच्या वाहिन्या अजूनही कौटुंबिक मालिकांच्या गुलाबी दिवसांमधून बाहेर येण्यास उत्सुक नाहीत. त्यामुळे वेगळ्या विषयाच्या मालिका दाखवण्यासाठी नव्या वाहिन्यांची निर्मिती करण्याचा पर्याय त्यांनी स्वीकारला. ‘स्टार प्लस’वरील मालिकांपेक्षा थोडे धाडसी प्रयोग हाताळण्यासाठी ‘लाइफ ओके’ या नवीन वाहिनीची निर्मिती करण्यात आल्याचे वाहिनीचे बिझनेस हेड अजित ठाकूर सांगतात. ‘सोनी’ वाहिनीच्या बाबतीत नेमकी हीच बाब उलटी ठरली आहे. सुरुवातीपसून गुप्तहेर, पोलीस, रिअ‍ॅलिटी शोजच्या वाटेवर चालणाऱ्या या वाहिनीवर दाखवल्या जाणाऱ्या कौटुंबिक मालिकांकडे मात्र प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे या समूहांतर्गत ‘सोनी पल’ वाहिनीची निर्मिती करत या मालिका तेथे वळवण्यात आल्या आहेत. त्याच वेळी कौटुंबिक मालिकांवरील प्रेमापोटी ‘स्टार उत्सव’, ‘रिश्ते’, ‘झी अनमोल’ या वाहिन्यांच्या माध्यमातून जुन्या मालिका पुन्हा प्रसारित करत आपला प्रेक्षकवर्ग धरून ठेवण्याचाही वाहिन्यांचा आटापिटा सुरू आहे.
अल्प प्रतिसाद
गेल्या काही काळामध्ये टीव्हीवर काही प्रयोग करत वेगळ्या विषयावरच्या मालिकांची निर्मितीही सुरू करण्यात आली होती. पण, त्या मालिकांना प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळेनासा झाल्याने वाहिन्यांकडेही कौटुंबिक मालिकांकडे परत फिरण्याखेरीज दुसरा मार्गच शिल्लक राहिलेला नाही. ‘स्टार प्लस’चे जनरल मॅनेजर गौरव बॅनर्जीच्या म्हणण्यानुसार, ‘वेळोवेळी आम्ही कौटुंबिक मालिकांपेक्षा वेगळ्या विषयावरच्या मालिका बनवण्याचा प्रयत्न केला होता. पण, माध्यमांकडून त्या प्रयत्नांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही आणि प्रेक्षकांनीही या मालिकांकडे पाठ फिरवली. वेगळ्या विषयाच्या मालिकांनाही प्रेक्षकांचा पुरेसा प्रतिसाद मिळाला तर अशा मालिका बनवण्याचा प्रयत्न आमच्याकडूनही सातत्याने होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2014 1:12 am

Web Title: when serials themes going to change
Next Stories
1 तेंडुलकरांची ‘कमला’ परत येतेय..
2 सरधोपट
3 गहिरे नाटय़
Just Now!
X